कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू आहे. दोन्ही नेत्यांची नावं आघाडीवर आहे. मात्र काल झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री निवडीचे अधिकार एकमताने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्याचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव आमदारांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
२-३ वर्ष कार्यकाल विभागणीचा प्रस्ताव
सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावानुसार पाच वर्षांच्या टर्मचे दोन भाग करण्यात येतील. पहिली दोन वर्ष सिद्धारामय्या हे मुख्यमंत्री राहतील आणि पुढील तीन वर्ष डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्री असतील असा प्रस्ताव सिद्धारामय्या यांनी खरगे यांना दिला आहे. सिद्धारामय्या हे कुरबा समुदायातील आहेत तर डी. के.शिवकुमार हे वोक्कलिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण हा तिढा कसा सोडवायचा असा प्रश्न खरगेंसमोर निर्माण झाला आहे.
डी. के. शिवकुमार यादव यांना गृह खाते आणि उपमुख्यमंत्रिपद
सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते यावर डी. के. शिवकुमार तयार झाले आहेत. डी.के. शिवकुमार यांनी पक्ष नेतृत्त्वाला तसा प्रस्ताव दिला असल्याची माहिती आहे. काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार विजयी झालेल्या ७० टक्के आमदारांचं समर्थन सिध्दारामय्या यांना होतं.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांच्याशी चर्चा केल्यावर मल्लिकार्जून खरगे अंतिम निर्णय जाहीर करतील. काँग्रेस सिद्धारामय्या यांचा फॉर्म्युला मान्य करणार की खरगे आणखी वेगळा निर्णय घेणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.