अब्दुल वाजेद, छत्रपती संभाजीनगर : घरातील पायऱ्यांवरून उतरताना वरून आलेलया लिफ्टमध्ये डोकं अडकून एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कटकट गेट परिसरात घडली. मृत मुलाचं नाव साकेब सिद्दीकी इरफान सिद्दीकी (वय १३, रा. शहाबाजार) असं आहे. या घटनेची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकेब सिद्दीकी इरफान सिद्दीकी या मुलाचे पालक हे हैदराबादला गेले होते. तो शहाबाजारहून आपल्या आजी-आजोबांकडे राहण्यासाठी आला होता. कटकट परिसरातील राहत हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या तीन मजली इमारतीत साकेब सिद्दीकी याचे आजी-आजोबा वास्तव्यास आहेत. या इमारतीत राहणाऱ्या वृद्धांसाठी तळमजल्याहून दुसऱ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी काचेची लिफ्ट लावण्यात आली होती. साकेब सिद्दीकी याच्या मृत्यूबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, साकेब हा पहिल्या मजल्यावर खेळत होता. तो पायऱ्यांवर खेळत असताना, पायऱ्यांवरून खाली वाकला. साकेब हा खाली वाकलेला असताना, वरून आलेल्या लिफ्टमध्ये साकेबचे डोके अडकले. डोके लिफ्टखाली आणि शरीर पायऱ्यांवर अशी साकेबची अवस्था होती.

दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अद्दल घडवणार; अकोला, शेवगावातील दंगलींनंतर देवेंद्र फडणवीसांचा सज्जड इशारा

साकेबचा आवाज आल्यानंतर या इमारतीमधील लोकांनी धावपळ केली. मात्र तोपर्यंत साकेबचा जीव गेला होता. या प्रकरणाची माहिती मिळाताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण हे घटना स्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन जिन्सी पेालीस ठाण्यात या घटनेची नोंद केली.

साकेबचे पालक सोमवारी १० वाजता पोहोचले!

या घटनेची माहिती साकेबच्या पालकांना देण्यात आली. साकेबचे आई आणि वडील हे सोमवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान शहरात आले. साकेबवर दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान छोटा तकीया कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साकेब हा इरफान सिद्दीकी यांचा एकलुता मुलगा होता. त्यांना दोन मुली आहेत.

अडीच बाय चारची लिफ्ट

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर इमारतीमध्ये लावलेली लिफ्ट ही तीन बाजूने काचेची आहे. एका बाजूने या लिफ्टचा दरवाजा आहे. ही लिफ्ट अडीच बाय चारची असून ही लिफ्ट दुसऱ्या मजल्यापर्यंत वृद्धांसाठी लावण्यात आलेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here