चेन्नई: महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२४ मध्ये खेळणार की यंदाची स्पर्धा हीच त्याची अखेरची स्पर्धा ठरणार? असा प्रश्न थालाच्या चाहत्यांसोबत कोट्यवधी क्रिकेट रसिकांना पडला आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात धोनीनं अनेकदा निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मात्र लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या सामन्यावेळी धोनीनं केलेल्या विधानानं सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं. ही माझी शेवटची आयपीएल असेल, असं मी ठरवलेलं नाही, असं धोनी म्हणाला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. जाडेजानंतर मैदानात येणारा धोनी मोजके चेंडू खेळतो. त्यावर चौकार, षटकार खेचतो. काही दिवसांपूर्वीच सीएसकेचा माजी फलंदाज सुरेश रैनानं धोनीच्या निवृत्तीबद्दल महत्त्वाचं विधान केलं. ‘धोनीनं यंदाची आयपीएल जिंकण्याची योजना आखली आहे. पुढील आयपीएल खेळण्याचाही त्याचा मानस आहे,’ असं रैना म्हणाला आणि चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.काल चेन्नईत सीएसके विरुद्ध केकेआर सामना रंगला. सामन्यानंतर धोनीनं मैदानाला फेरी मारली आणि चाहत्यांना, प्रेक्षकांना अभिवादन केलं. यंदाच्या हंगामातील चेपॉकवरचा शेवटचा सामना सीएसकेचा संघ काल खेळला. त्यानंतर धोनीनं मैदानात फेरी मारत चाहत्यांचे आभार मानले. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. यावर आता सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या कासी विश्वनाथन यांनी भाष्य केलं आहे. ‘धोनी पुढच्या हंगामातही खेळेल असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यामुळे चाहते आम्हाला पाठिंबा देत राहतील, अशी आशा आहे,’ असं विश्वनाथन म्हणाले. महेंद्रसिंह धोनी २००८ पासून सीएसकेसाठी खेळतो आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईची कामगिरी जबरदस्त झाली आहे. चेन्नईच्या संघानं १३ पैकी ११ वेळा बाद फेरीत धडक दिली. धोनीच्या नेतृत्त्वात सीएसकेचा संघ ९ वेळा अंतिम फेरीत पोहोचला. पैकी ४ वेळा संघानं जेतेपदाला गवसणी घातली. आयपीएलच्या सर्वच्या सर्व १६ हंगामात खेळलेल्या खेळाडूंची संख्या केवळ सात इतकी आहे. त्यात धोनीचा समावेश आहे. आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणाऱ्या सात खेळाडूंमध्येही धोनीचा नंबर लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here