Gautami Patil Complaint In Barshi Police Station After Dance Program; गौतमीच्या कार्यक्रमामुळे आयोजक फसला, नंतर तिलाही अडचणीत आणलं; सोलापुरात घडला भलताच प्रकार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात १२ मे रोजी रात्री गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी पाटील व तिच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केल्याची तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली आहे. गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा गायकवाड यांनी आरोप केला आहे. १२ मे रोजी रात्री झालेल्या कार्यक्रमाची परवानगी न घेतल्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यात आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गर्दी जमविली तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशन व बार्शी नगरपालिकेची रीतसर परवानगी न घेता कार्यक्रम घेतला, अशी नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.राजेंद्र गायकवाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी १२ मे रोजी संध्याकाळी ७ वाजताची वेळ ठरलेली होती. मात्र असं असताना गौतमी ९ वाजून ५६ मिनिटांनी स्टेजवर आली. एकच गाणं झाल्यानंतर पोलिसांनी वेळ संपली म्हणून कार्यक्रम बंद पाडला. नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार गायकवाड यांनी केला आहे.
आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गौतमीविरोधात तक्रार
बार्शी नगरपालिका हद्दीत विनापरवानगी कार्यक्रम आयोजित करून मोठी गर्दी केल्याने आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्याविरोधात दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी पाटीलविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.