म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः चार वर्षाच्या बहिणीसमोर ११ वर्षाच्या भावाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी गिरगाव परिसरात घडली. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडली असून यामध्ये मला अजून जगायची इच्छा नाही, असे या मुलाने लिहून ठेवले आहे.

गिरगाव येथील एका प्रसिध्द चाळीमध्ये ११ वर्षाचा पप्पू (बदललेले नाव) आई वडील आणि चार वर्षाच्या बहीणीसोबत राहत होता. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आई वडील घरातील साहित्य आणण्यासाठी बाजारात गेले. जाताना बहिणीची काळजी घे, असे पप्पूला सांगून गेले. साडेसातच्या सुमारास दोघे घरी परतले त्यावेळी पप्पू घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. पालकांनी शेजारी राहणाऱ्यांच्या मदतीने त्याला जे. जे. रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून पप्पूला मृत घोषित केले.

या घटनेची माहीती मिळताच विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर पोलिसांना तीन ओळीची एक चिठ्ठी सापडली. यामध्ये मला जगायचे नसल्याचे पप्पू याने म्हटले आहे. मात्र इतक्या कमी वयात पप्पू ने हे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही. ११ वर्षाचा मुलगा गेल्याने त्याच्या आई वडिलांना धक्का बसला आहे. त्यामुळे अद्याप त्यांचे जबाब नोंदविले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here