या दोन मार्गिकेवरून १ ते १३ मे दरम्यान २० लाख ४३ हजार ८८९ प्रवाशांनी ये-जा केली. त्याची सरासरी १.५७ लाख प्रतिदिवस होते. या मार्गिकेचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ तर दुसरा टप्पा २० जानेवारी २०२३ ला सुरू झाला. २० जानेवारीपासून या दोन्ही मार्गिका पूर्ण रूपात सुरू झाल्या. त्यानुसार २० जानेवारी २०२३ ते १३ मे २०२३ दरम्यानची प्रवासीसंख्या १ कोटी ३९ लाख ९६ हजार ७१३ इतकी राहिली आहे. दररोजची सरासरी १.५२ लाख इतकी होते, अशी माहिती देण्यात आली.
मेट्रो ७ मार्गिका संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोरेगाव फिल्मसिटीसह पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर ते अंधेरीदरम्यान संलग्नता देते. सध्या सुट्ट्या असल्याने राष्ट्रीय उद्यान व फिल्मसिटी बघायला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. तर मेट्रो २ अ ही मार्गिका गोराईतील पॅगोडा, एस्सेल वर्ल्ड यांना मालाड, गोरेगाव पश्चिमेला संलग्नता देते. उन्हाळी सुट्टीत तेथे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने मेट्रोची प्रवासीसंख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबईतील पहिली मार्गिका असलेल्या वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवरील प्रवासीसंख्या मात्र कमी झाली आहे. १ ते १३ मेदरम्यान या मार्गिकेचा ३६ लाख प्रवाशांनी वापर केला. त्याची सरासरी २.४० लाख इतकी होते. ही मार्गिका प्रामुख्याने मुंबईच्या पूर्व उपनगरातील अंधेरीत नोकरीला जाणाऱ्यांना उपयुक्त ठरते. त्यावर पर्यटनाची फार केंद्रे नाहीत. अनेक नागरिक या काळात गावी किंवा सुट्टीवर असतात. त्यामुळेच मेट्रो १ वरील सरासरी प्रवासीसंख्येत किमान २० टक्क्यांची घट झाली आहे. मेट्रो १ वर दररोज ३६८ व मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ वर दररोज २५३ फेऱ्या चालवल्या जात आहेत.