जळगाव : पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील एका दिराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून आयुष्यभरासाठी सोबत राहण्याची शपथ घेत वहिनीला आधार देऊन तिचं एकटेपण दूर केलंय. तर दुसरीकडे केवळ विवाहच नाही तर विधवा वहिनीबरोबरच जुळ्या मुलीसह आठ महिन्याचा पुतण्याची देखील त्याने जबाबदारी स्विकारुन तो पितृछत्र हरपलेल्या चिमुकल्यांचा बाप झाला आहे. राहुल विनोद काटे (वय-३१) असं या दिराचं नाव असून त्याने अनिता काटे (वय-२८) या विधवा वहिनीसोबत लग्नाची रेशीमगाठ बांधली आहे. राहुल काटे याने घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय.

गतवर्षी शेतकरी संभाजी काटे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मिक निधानाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला . संभाजी यांच्या निधन झाले त्यावेळी त्यांना दोन जुळ्या मुली तर त्यांची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. संभाजी काटे यांच्या अकस्मिक निधनामुळे बाळ जन्माला येण्याआधी दोन जुळ्या मुलींचे पितृछत्र हरपले होते. संभाजी यांच्या निधनानंतर काही दिवसानंतर त्यांची पत्नी अनिता यांनी मुलाला जन्म दिला. यादरम्यान संभाजी यांचा धाकटा भाऊ राहुल याने भावाच्या निधनामुळे विधवा झालेल्या वहिनी सुनीता व त्यांच्या दोन जुळ्या मुली व आठ महिन्यांच्या मुलाला आधार दिला.

कमी वयात विधवा झालेल्या वहिनीचे दु:ख राहुलकडून पाहवत नव्हतं. त्यामुळे त्याने वहिनीसोबत लग्नगाठ बांधून तिला व तिच्या मुलांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचा निर्णय घेतला. तसेच सून अनिता यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलावं, आपली वहिनी समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा पुन्हा सौभाग्यवती म्हणून पुन्हा घरात वावरावी, म्हणून राहुल काटे यांच्या निर्णयाला कुटुंबियांनी पाठिंबा दर्शविला.

पतीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी बाळाला जन्म, दिराने भावाच्या लेकराला आपलं मानलं, वहिनीशी लग्नगाठ बांधली!
राहुलवर कौतुकाचा वर्षाव

कुटुंबियांनी होकार दर्शविल्यानंतर राहुल व त्याची विधवा वहिनी यांचा विवाह मंगळवारी कोळपिंप्री गावातील भवानी मंदिरात नातेवाईकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. लग्नाच्या रेशीमगाठी बांधत विधवा वहिनी आणि दीर विवाह बंधनात अडकले. या विवाह सोहळ्यामुळे विधवा अनिता हिला पती तर मिळालाच पण तिच्या जुळ्या मुली विद्या व वैभवी आणि आठ महिन्याचा चिमुकला मयांक यांनाही बाप मिळाला.

राहुल याने आपली स्वप्न बाजूला सारत मोठे मन दाखवून आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या विवाहाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. राहुलने घेतलेला निर्णय अतिशय अभिमानास्पद असून मराठा समाजामध्ये अशा निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. खरं तर ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त करत शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे यांनी व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here