गुवाहाटी: वादग्रस्त महिला उपनिरीक्षक जुनमोनी राभा यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. नागाव जिल्ह्यातील कलियाबोरमधील जाखलाबंधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला अपघात झाला. सरुभुगिया गावाजवळ महिला पोलीस अधिकाऱ्याची कार एका कंटेनरला धडकली. अपघातात जुनमोनी राभा यांचा मृत्यू झाला. यावेळी त्या पोलिसी गणवेशात नव्हत्या. आपल्या खासगी कारमधून त्या प्रवास करत होत्या.रात्री दीडच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाल्याचं जाखलाबंधा पोलीस ठाण्याचे प्रभारी पवन कालिता यांनी दिली. ‘घटनेची माहिती गस्ती पथक अपघातस्थळी पोहोचलं. त्यांनी जुनमोनी राभा यांना रुग्णालयात नेलं. मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. उत्तर प्रदेशातून आलेला कंटेनर पोलिसांनी जप्त केला आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे. नागावच्या पोलीस अधीक्षक लिना डोले यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे,’ असं कालिता यांनी सांगितलं. जुनमोनी राभा त्यांच्या खासगी कारमधून साध्या कपड्यांमध्ये एकट्याच का निघाल्या होत्या, याची माहिती पोलिसांकडे नाही. विशेष म्हणजे राभा यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्या कुटुंबातील कोणालाही कल्पना नव्हती. लेडी सिंघम नावानं सुपरिचित असलेल्या जुनमोनी राभा यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांच्या माजी प्रियकराला कथित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली होती. त्यांनी आपल्या प्रियकरासोबतचा साखरपुडा मोडला होता. माजुली जिल्ह्यातील न्यायालयानं त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं. काही कालावधीनंतर निलंबन रद्द करण्यात आलं. त्यानंतर त्या पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाल्या होत्या. राभा यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली. ‘माझी बहीण गुवाहाटीच्या घरातून निघाली. आपली सहकारी आभा राभासोबत जात असल्याचं तिनं आम्हाला सांगितलं होतं. मात्र ती एकटीच जात असल्याचं आम्हाला नंतर समजलं. आपण जुनमोनीसोबत जात नसल्याचा दावा आभा यांनी केला,’ असं जुनमोनीचे बंधू करुणा राभा यांनी सांगितलं.
Home Maharashtra लेडी सिंघमचा संशयास्पद शेवट; कुटुंब, पोलीस प्रवासाविषयी अंधारात, एकट्या कुठे निघालेल्या?