गेल्या आठवड्यात नीरजने आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुले, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचँग यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय साहाय्यक बोलत असल्याचे सांगून मंत्रिपद देण्याचे आमिष त्याने आमदारांना दाखविले. त्याच्या आमिषाला तीन आमदार बळी पडले. या आमदारांनी नीरजच्या ओळखीच्या मोबाइल विक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. ही माहिती नीरजने प्राथमिक तपासात दिली आहे. तो देत असलेली माहिती खरी आहे की खोटी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सखोल चौकशीनंतर याबाबत भाष्य करता येईल, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘मटा’ला सांगितले. दरम्यान, गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला. यासाठीही नीरजने आमदारांना पैशाची मागणी केली. भोजनाच्या कंत्राटाचे पैसे देण्यास आमदारांना त्याने सांगितले होते.
एकाने केली होती दिल्लीची तयारी
नीरज टाइल्सच्या दुकानात काम करतो. तो तासंतास वाहिन्यांवरील राजकीय वृत्तांकन बघतो. इंटरनेटद्वारे त्याने अनेक आमदारांची माहिती व त्यांचे मोबाइल क्रमांक गोळा केले आहेत. याशिवाय जे. पी. नड्डा यांचा आवाज काढण्याचाही सराव केला आहे. ‘साहेबांशी बोला’ असे सांगून तो स्वत:च नड्डा यांचा आवाज काढून आमदारांशी बोलायचा. त्याने एका आमदाराला दिल्लीला बोलावून राज्य उत्पादन शुल्क विभाग देण्याचे आमिष दिले. त्या लालसेने या आमदाराने दिल्लीला जाण्याचीही तयारी केली होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.