चेन्नई: अनोळखी मोबाइल फोन क्रमांकावरून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून महिलेला त्रास देणाऱ्या तरुणाला तिनं चांगलीच अद्दल घडवली आहे. चेन्नईतील अरुमबक्कममध्ये ही घटना घडली आहे. मेसेज आणि व्हिडिओ पाठवणारा तरूण तिनं टाकलेल्या जाळ्यात अलगद अडकला. या तरुणाला जेरबंद करण्यात तिच्या घरच्यांनीही मदत केली.

गेल्या चार वर्षांपासून ही महिला आपल्या आईवडिलांकडे राहत आहे. पतीशी वाद होऊ लागल्याने ती पतीपासून वेगळी झाली आहे. ४ ऑगस्टला तिला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्ती तिच्याशी असभ्य भाषेत बोलत होती. त्यामुळे रागाने तिने फोन कट केला. त्यानंतर तिला वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन येत होते. तो तिच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलत होता. ८ ऑगस्टला तिच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आला होता. अखेर तिनं याबाबत आईवडिलांना सांगितलं. मला अनोळखी व्यक्ती अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवत असल्याचे तिने त्यांना सांगितलं. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याआधी त्रास देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी यांनी प्लान आखला.

महिलेने त्याला फोनवरून मेसेज पाठवून घरी भेटायला बोलावले. तिने मेसेजमध्ये घराचा पत्ताही दिला. त्यावर तो तरूण घरी येऊन भेटण्यास तयार झाला. ठरल्यानुसार, ती खोलीत थांबली. तर तिचे कुटुंबीय घरात दुसऱ्या ठिकाणी लपून बसले. ती व्यक्ती घरी आली. तिने त्याला खोलीत नेले. अचानक घरातील इतर सदस्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांना कळवले.

पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्या तरुणाची महिलेच्या कुटुंबीयांच्या तावडीतून सुटका केली. आर. विमलराज असं या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. तो एक इ-कॉमर्स कंपनीसाठी डिलिव्हरी एजंटचं काम करतो. त्याने सांगितले की, मला मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर मी फोन करतो. जर समोर एखादी महिला असेल तर तिला मी मेसेज आणि व्हिडिओ पाठवून त्रास देतो, अशी कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात तिच्या पतीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here