वातावरण तापले
गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री संदल मिरवणुकीदरम्यान घडलेले प्रकरण दोन दिवसांत चांगलेच तापले आहे. हिंदू महासभेसह अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, भाजप अध्यात्मिक आघाडी, युवा मोर्चा, नाशिक पुरोहित संघ, ‘लव्ह जिहाद संघटने’च्या प्रतिनिधींनी बुधवारी त्र्यंबकमध्ये धाव घेतली. या पदाधिकाऱ्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पायऱ्यांचे शुद्धीकरण करण्यासह महाआरती केली. ‘हिंदूशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे,’ अशा आशयाचा फलकही उत्तर प्रवेशद्वारावर लावण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी राजकीय वक्तव्ये करून संदलनिमित्त धूप दर्शवण्याची परंपरा नसल्याचा दावा केला, तर त्याच वेळी नगर परिषदेत सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत संदल मिरवणुकीत परंपरेनुसारच धूप दाखविण्यात आल्याचे एकमताने सांगण्यात आले. एकाच वेळी या दोन घटनांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले. राजकीय दबावतंत्र वापरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ग्रामस्थांसह भाविकांनी केली.
‘इथे राजकारण नकोच’
सकल हिंदू महासभेने बुधवारी दुपारी त्र्यंबकेश्वराची महाआरती केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, आचार्य तुषार भोसले यांनी राजकीय टीका केली. त्या वेळी मंदिर आवारातून ‘इथे राजकारण करू नका,’ अशी आरोळी एकाने ठोकली. तिथे तैनात दंगल नियंत्रण पथक, ग्रामीण पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा दल या यंत्रणांसह विक्रेते व स्थानिकांनीही या टीकेवरून नाराजी व्यक्त केली.
नेमके काय घडले?
गुलाब शाहवली बाबा संदल मिरवणुकीदरम्यान शनिवारी मुस्लिम समुदायातील पाच-सात युवक त्र्यंबकेश्वराला धूप दाखविण्यासाठी उत्तर प्रवेशद्वाराजवळ दाखल झाले. देवाला धूप दाखविण्यासाठी मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. ही प्रथा जुनी असून, आम्हाला दर वर्षी आत सोडले जाते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश नसल्याचे सांगून सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. या वेळी उपस्थित काही भाविकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. त्यानंतर अफवा पसरू लागल्या.
वाद मिटला अन् चिघळलाही
वादानंतर गेल्या रविवारी हे प्रकरण मिटले होते. मात्र, राजकीय प्रतिनिधी तसेच काही संघटनांनी यात उडी घेतल्याने वाद वाढला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात घडल्या प्रकाराबाबत मंगळवारी ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे आदेश दिले. दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांचाही बंदोबस्त वाढला. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून चार संशयितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान, मंदिराभोवती अलीकडेच नेमण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या सुरक्षाव्यवस्थेने मुस्लिम तरुणांना रोखल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.