मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या, पण प्रवासाची सोय नसलेल्या चाकरमान्यांसाठी खूषखबर आहे. कोकणासाठी १६२ विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. उद्यापासून या गाड्यांसाठी बुकिंग सुरू होणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरी, कुडाळ व सावंतवाडीसाठी या गाड्या सुटणार आहेत. या सर्व गाड्या केवळ चाकरमान्यांसाठी राखीव असतील. विशेष रेल्वे गाड्यांना जाणाऱ्या सर्व प्रवाशांना गाडीत प्रवेश करताना, प्रवासात व अखेरच्या स्थानकांवर अशा सर्व ठिकाणी ‘कोविड १९’च्या अनुषंगाने प्रशासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे लागतील, असं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या नियमांमुळं कोकणातील चाकरमान्यांना वेळेवर गावाकडे पोहोचणे आवश्यक आहे. राज्य सरकारनं यासाठी तात्काळ व्यवस्था करावी, अशी ओरड सातत्यानं सुरू होती. याची दखल घेऊन राज्य सरकारनं एसटीच्या बस सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णयही सरकारनं घेतला होता. त्यानुसार मध्य रेल्वेनं १९० गाड्यांची तयारीही ठेवली होती. मात्र, ऐनवेळी राज्य सरकारनं गाड्या न सोडण्याची सूचना दिल्यानं पुढं काहीच झालं नाही. अखेर आता या गाड्या सुटणार आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here