रोम: इटलीमध्ये एका कुत्र्यामुळे पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. इक्वेडोरमधून आयात करण्यात आलेल्या केळ्यांमध्ये अमली पदार्थांचा साठा लपवण्यात आला होता. कुत्र्यानं हा साठा शोधून काढला. कुत्र्याच्या हुशारीमुळे पोलिसांनी तब्बल २७०० किलोचे अमली पदार्थ जप्त केले. हा संपूर्ण साठा ७० टन केळ्यांमध्ये सापडला. पोलिसांनी जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ९० कोटी डॉलरच्या (७२०० कोटी रुपये) आसपास आहे.तब्बल ७० टन केळ्यांमध्ये लपवून अमली पदार्थांचा साठा इटलीमार्गे अर्मेनियाला पाठवला जात होता. दोन कंटेनरमधून हा साठा गियोइया ताऊरो बंदरात पोहोचला. त्याबद्दल पोलिसांना संशय आला. त्यांनी कंटेनर्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. केळ्यांची निर्यात करणाऱ्या कंपनीनं याआधी कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याच फळांचा साठा इतर देशात पाठवला नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी जोएल नावाच्या कुत्राच्या मदतीनं तपासणी सुरू केली. जोएलनं केळ्यांच्या घडांमधून कोकेनचे खोके शोधून काढले. जोएल कंटेनरच्या जवळ जाताच लगेच वर चढला. त्यानंतर तो केळ्यांचे घड भरभर बाजूला सरकवू लागला. जोएलनं अमली पदार्थांचा साठा पकडला नसता, तर कोकेनने भरलेले खोके इटलीहून जॉर्जियाला आणि तिथून पुढे अर्मेनियाला पोहोचले असते. गियोइया ताऊरो बंदरात २०२१ पासून आतापर्यंत अधिकाऱ्यांनी ३७ टन कोकेन पकडलं आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. इक्वेडोरसह दक्षिण अमेरिकेतील अनेक देश जगभरात अमली पदार्थांची तस्करी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here