या प्रकरणी पती-पत्नी मीराबाई भूमे व योगेश भूमे (रा. हनुमान नगर, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलठाणा परिसरातील योगेश लॉजिंग बोर्डिंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
साधारण २० ते २५ वर्ष वयोगटातील पीडित मुलींचे छायाचित्र दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जात होते. माहितीची खात्री करून पोलिसांडून सापळा रचण्यात आला. रात्री सात वाजताच्या सुमारास पोलिसांनी पाचशे रुपयांच्या दोन नोटा देऊन डमी ग्राहक पाठवला. डमी व्यक्तीने आरोपींकडे महिलेची मागणी केली. त्यानंतर त्या व्यक्तीने डमी व्यक्तीसमोर चार महिला उभ्या केल्या. यातील कुठली महिला पाहिजे ते सांगा असे विचारले. डमी व्यक्ती महिलेला पसंत करून खोलीत घेऊन गेला.
दरम्यान बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांना त्याने इशारा केला. यावेळी पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा परराज्यातील काही तरुणींसह सहा जणी त्या ठिकाणी आढळून आल्या. यावेळी आरोपींकडून रोकड आणि इतर साहित्य असा 61 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.