आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आता सॉफ्ट सिग्नल नियम कायमचा संपुष्ठात येणार आहे. आयसीसीने हा निर्णय घेतला असून याची सुरुवात येत्या ७ जून पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपासून होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील द ओव्हल मैदानावर होणाऱ्या मॅचमध्ये हा नियम असणार नाही. सॉफ्ट सिग्नल नियम रद्द करण्यासाठी सौरव गांगुलीने मंजुरी दिली आहे. गांगुली ICCच्या क्रिकेट समितीचा अध्यक्ष आहे. गांगुलीनेच हा नियम संपुष्ठात येत असल्याची माहिती WTC फायनल खेळणाऱ्या दोन्ही देशांच्या संघांना दिली आहे. या संदर्भातील वृत्त क्रिकबझने दिले आहे.
क्रिकेटमधील सॉफ्ट सिग्नल नियमावर याआधी अनेक दिग्गज खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. माजी आणि सध्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी देखील हा नियम रद्द करण्याची मागणी केली होती. हा नियम रद्द करून तिसऱ्या अंपायरकडे दिला पाहिजे, कारण तिसऱ्या अंपायरकडे निर्णय घेण्यासाठी आधुनिक यंत्रणा असते. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने देखील या वादग्रस्त नियमावर प्रश्न उपस्थित केले होते.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत मार्नस लाबुशेनला सॉफ्ट सिग्नल नियमाने बाद दिले होते. लाबुशेनचा कॅच स्लिपमध्ये पकडण्यात आला होता. पण कॅच घेतला आहे का हे स्पष्टपणे कळत नव्हते. मैदानावरील अंपायरने बाद दिल्यानंतर तिसऱ्या अंपायरने लाबुशेनला नाबाद ठरवले होते. गेल्या वर्षी या नियमाचा फायदा इंग्लंड संघाला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत झाला होता.
काय आहे सॉफ्ट सिग्नल नियम
सॉफ्ट सिग्नल नियमानुसार मैदानावरील अंपायर एखाद्या गोष्टीवर निर्णय घेतात. यासाठी ते तिसऱ्या अंपायर्सची मदत घेऊ शकतात. पण तिसऱ्या अंपायरला देखील त्याबाबत स्पष्ट निर्णय घेता आला नाही तर मैदानावरील अंपायरने घेतलेला निर्णय अंतिम ठरतो. उदा- एखादा फलंदाज कॅच आऊट झाला. पण कॅच घेतला आहे का हे स्पष्ट होत नाही तर मैदानावरील अंपायर सॉफ्ट सिग्नल नियमाने बाद किंवा नाबाद असा निर्णय देतो. यावर थर्ड अंपायर व्हिडिओ फुटेज पाहून निर्णय घेतात. मात्र थर्ड अंपायरला पुरेसे पुरावे मिळाले नाही तर मैदानावरील अंपायरने घेतलेला निर्णय अंतिम ठरतो.