नेट-रनरेट हे कोणत्याही संघाच्या फलंदाजीच्या रनरेटमधून गोलंदाजीचे रनरेटमधून वजा केले जाते. उदा- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० षटकात २०० धावा केल्या आणि नंतर गोलंदाजीत २० षटकात १२० धावा दिल्या तर त्यांचे नेट रनरेट ४ इतके होईल. आरसीबीने २० ओव्हरमध्ये २०० धावा केल्या म्हणून त्याचे फलंदाजीचे रनरेट १० होईल. तर गोलंदाजीत १२० धावा दिल्याने गोलंदाजीचे रनरेट ६ होईल. नेट रनरेट काढण्यासाठी १० मधून ६ वजा केले जातील.
जेव्हा एखादा संघ ओव्हर संपण्याआधी ऑल आउट होतो तेव्हा देखील नेट रनरेट हे संपूर्ण २० ओव्हरच्या आधारावर काढले जाते. उदा-आरसीबीविरुद्ध हैदराबादचा संघ १८ षटकात १०८ धावांवर बाद झाला तरी त्यांचे फलंदाजीचे रनरेट ५.४ इतके होईल. (१०८ धावा/२०=५.४)
पावसामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे जर सामना थांबला तर नेट-रनरेट प्रत्यक्षात कराव्याच्या धावांच्या ऐवजी सुधारीत लक्ष्य काय त्यावरून काढले जाते. उदा- आरसीबीने २० षटकात २०० धावा केल्या आणि पावसामुळे हैदराबादला १६ षटकात १८० धावांचे टार्गेट मिळाले तर नेट रनरेट १६ षटकांमध्ये काढलेल्या धावांवर होईल.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने संपूर्ण ओव्हर खेळल्या आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ ऑलआउट झाला तर त्यांना नेट रनरेटमध्ये संपूर्ण ओव्हर खेळल्याचा फायदा मिळू शकतो. लीगमध्ये नेट-रनरेट प्रत्येक मॅचनंतर कमी किंवा जास्त होते.