मोबाईल शॉप चालकाच्या खात्यात पैसे मागवले
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री होण्यासाठी नीरजच्या जाळ्यात ३ आमदार आले होते. गुजरातमधील आरएसएसच्या कार्यक्रमाची माहिती नीरजने आमदारांना दिली होती. यामध्ये आमदारांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी केटरिंग ठेकेदाराला पैसे देण्यास सांगितले होते. काही नेत्यांना लालूच दाखवून त्यांना पैसे पाठवायला लावले. पण काहींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य चांगलेच माहिती होते. त्यामुळे पैसे मागताच त्यांना संशय आला.आरोपीने हे पैसे त्याच्या घराजवळ असलेल्या मोबाईल शॉपीचालकाच्या खात्यात मागितले. त्यामुळे आता मोबाईल शॉपीचालक पोलिसांच्या रडारवर आला आहेत.
आरोपी हा टाइल्स बनवणाऱ्या कंपनीत काम करतो
नीरज याने ज्या प्रकारे आमदारांशी संवाद साधला त्यावरून त्याला राजकीय घडामोडींची पूर्ण माहिती असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी सर्वत्र साधे-सरळ स्वभावाचे छोटे नेते निवडले. यापूर्वी त्याने आमदार कुंभारे यांना फसवले. नगरविकास मंत्रालय देतो, म्हणून ऑफर दिली. नंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्रीपद देतो म्हणून सांगितलं. दरम्यान, नीरज हा मोरबी येथील टाइल्स बनवणाऱ्या कंपनीत काम करत असल्याचं तपासात समोर आलंय. यासोबतच त्याच्यावर दिल्लीत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या आमदारांना केले होते फोन
नीरजने मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे, गोव्याचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि नागालँडचे बाशा मोवचांग यांना मंत्रिपदासाठी कॉल केला. त्याचा खोटारडेपणा कुंभारे यांना समजला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार केली. अन्य कोणत्याही आमदाराने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.