काय आहे ही परंपरा?
आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० जून रोजी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. या पालखी सोहळ्यात तुकाराम महाराजांची पालखी देहू गावच्या अनगडशाहबाबा दर्ग्यापर्यंत खांद्यावरती उचलून नेली जाते. त्यानंतर देहू वरून अभंग आरतीनंतर पालखी रथात ठेवून पुढे मार्गस्थ होते.
अनगडशाह बाबा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची चारशे वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम समाजाची एकता, सलोखा, समता, बंधुभाव, आणि एकात्मतेच्या पाऊलखुणांचे प्रतीक म्हणून ही प्रथा देहूत आजही जपली जाते. देहू गावालगतच अनगडशाह बाबा यांचा दर्गा आहे. त्यासमोर मेघडंबरी देखील आहे. तेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अभंग आरती स्थान आहे. हिंदू आणि मुस्लीम धर्माची दोन्ही स्थानं अगदी जवळ जवळ आहेत. आजही, तुकाराम महाराजांची पालखी देहूतील इनामदारसाहेब वाड्यापासून दर्ग्यापर्यंत खांद्यावर नेली जाते. तिथे अभंग आरती होते आणि त्यानंतर पालखी रथात ठेवून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतिक म्हणून आजही या भेटीकडे पाहिले जाते. हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू-मुस्लीम भाविक या ठिकाणी येत असतात.
काय आहे या परंपरेचा इतिहास?
अनगडशाह बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्यात मैत्रीचे नाते असल्याचे मानले जाते. जगद्गुरू तुकाराम महाराजांची विठुराया प्रती असलेली अजोड भक्ती, आसक्ती आणि महाराजांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लीम संतांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांसह सौहार्द प्रस्थापित केलं . तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी अनगडशहा बाबा पुण्यातून देहूत आले होते.
हिंदू मुस्लीम ऐक्याचं आणि सर्व भावनांच्या पलिकडे जाणारं आध्यात्म आहे. त्यामुळे आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाल्यानंतर, पहिला विसावा हा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यातच घेतला जातो. आजही या ऐक्याचे प्रतीक म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान हिंदुधर्मीय मुसुगडे कुटुंबाकडे आहे. मुसुगडे कुटुंबाची तिसरी पिढी अनगडशाह बाबांची सेवा करत आहेत.