प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हा सवाल केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुलायमसिंह यादव, लालकृष्ण अडवाणी आदी नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कठोर शब्द वापरले आहेत. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. पवारांनी काही भूमिका मांडली. त्यामुळे इतरांच्या जीवाची घालमेल होण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले. नाराज आहेत म्हणजे नेमकं काय आहे? पार्थ यांनी तुम्हाला तसं सांगितलं का? मीडियाने ठरवलं म्हणजे नाराज का? इतर पक्षातील नेत्यांची नाराजीही तुम्हीच ठरवत असतात, अशा शब्दात मीडियाला फटकारतानाच पवार आणि सुप्रिया सुळे यांचे मुंबईतल्या चव्हाण सेंटरमध्ये कार्यालय आहे. तिथेच ते कार्यकर्त्यांना भेटत असतात. त्यामुळे त्यांना तिथे भेटायला पार्थ पवार गेले असतील तर काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे प्रश्न तुम्ही मला का विचारता?, पार्थ पवार यांच्या भूमिका आणि निर्णयाबद्दल मी कसं बोलू शकतो?, त्यावर मी बोलणं नैतिकतेला धरून नाही, असं सांगतानाच आमच्याही पक्षात तरुण कार्यकर्ते आहेत. ते चुकले तर आम्हीही त्यांना सांगत असतो. मार्गदर्शन करत असतो. तरुणांचं राजकारण फार वेगवान असतं. सर्व राजकीय पक्षांनी त्यांना स्पेस दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.
पत्राचा राजकीय वापर थांबवा
पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्याला दोन महिने झालेत. तेव्हाची परिस्थिती आणि काळ वेगळा होता. आता परिस्थिती वेगळी आहे. त्या परिस्थितीचा आताच्या परिस्थितीशी संबंध लावू नका. त्यांच्या तेव्हाच्या पत्राचा राजकीय पक्षांनी वापर करणं थांबवावं, असं आवाहनही त्यांनी केली.
फडणवीसांचं कौतुक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे, त्याचं राऊत यांनी स्वागत केलं. फडणवीसांना बिहारची जबाबदारी दिली जात असेल तर त्याचं स्वागतच आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला मोठी जबाबदारी मिळणं या गोष्टीचं कौतुकच आहे. प्रत्येक पक्षात नेत्यांवर इतर राज्यांची जबाबदारी दिली जाते. आम्हीही जेव्हा एखाद्या जिल्ह्यात निवडणूक असते तेव्हा आमच्या इतर नेत्यांवर जबाबदारी देत असतो. हा प्रत्येक पक्षाच्या राजकीय रणनितीचा भाग आहे. त्यात गैर असं काहीच नाही, असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times