धरमशाला : पंजाब किंग्जला आपल्या गोलंदाजीचे नेटके नियोजन करायचे आहे, तर राजस्थान रॉयल्सला त्यांच्या बिरुदाला साजेशी कामगिरी करायची आहे. हे दोन मुद्दे इथे मांडण्याचे निमित्त म्हणजे आज शुक्रवारी हे दोन्ही संघ आयपीएल टी-२० स्पर्धेच्या लढतीत आमनेसामने येत आहेत. ही लढत जिंकून ‘प्ले-ऑफ’प्रवेशाच्या आशा किमान जीवंत ठेवण्याचे प्रतिस्पर्धी संघांचे ध्येय आहे.

विजय मिळाला तरी या लढतीतील यशस्वी संघास थेट आगेकूच करता येणार नाही. त्या संघास इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणारच आहे. त्यातल्या त्यात राजस्थानचा नेट रनरेट पंजाब किंग्जपेक्षा सरस आहे. तरीही या दोन्ही संघांमध्ये एक गोष्ट सारखी आहे. ती म्हणजे प्रतिस्पर्धी संघांच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव.

Sushma Andhare : अंधारेंच्या उपस्थितीत शिवसैनिक आपसात भिडले, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची गाडी फोडली
पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाची कामगिरी साजेशी नाही; तसेच गेल्या बुधवारी दिल्लीविरुद्धच्या लढतीत पॉवरप्ले किंवा डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये पंजाबकडून अर्शदीपच्या गोलंदाजीचा वापर का झाला नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. मुळात अर्शदीप हा पॉवरप्ले किंवा अखेरच्या षटकांमध्ये हमखास यॉर्कर टाकून फलंदाजांना जखडून ठेवण्यात पटाईत आहे, तरीही त्याच्या माऱ्याचा वापर करावासा पंजाबला वाटला नाही. यामुळे धवनच्या निर्णय क्षमतेबाबत भुवया उंचावतात.

पंजाबचा कर्णधार शिखर धवनने दिल्लीविरुद्धच्या गेल्याच लढतीत अखेरच्या विसाव्या षटकात डावखुरा फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रारकडे चेंडू सोपवला. हा निर्णय संघाच्या अंगलट आला, असे निर्णय पंजाबला नक्कीच टाळता आले असते. राजस्थान रॉयल्सने सुरुवात दणक्यात केली. पाच लढतींत चार विजय, अशी त्यांची कामगिरी होती. प्रतिस्पर्ध्यांमध्ये यामुळे दहशत निर्माण झाली होती. मात्र, हा जोश कायम राखणे राजस्थानला जमले नाही.

राजस्थानची बाजू

-यशस्वी जयस्वाल फलंदाजीत, तर यझुवेंद्र चहल गोलंदाजीत कमाल दाखवत असूनही राजस्थानला यशात सातत्य राखता आले नाही.

– बटलरनेही काही दमदार खेळी केल्या; पण नंतर अपयशाचे पाढे वाचले. गेल्या दोन सामन्यांत तर या इंग्लंडच्या फलंदाजाला भोपळाही फोडता आलेला नाही.

– संघनायक संजू सॅमसननेही निर्धाराने फलंदाजी करायला हवी. प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर सॅमसनने पंजाबच्या गोलंदाजांचा हुशारीने सामना करणे अपेक्षित आहे

पंजाबची बाजू

– कामगिरीत कमी पडणारा संघ म्हणजे पंजाब किंग्ज असे समीकरणच तयार झाले असून, यंदाचा मोसमही त्यास अपवाद नव्हता.

– महत्त्वाच्या क्षणी कामगिरी उंचावून बाजी मारण्याचे क्षण यंदाही पंजाबने वाया घालवले.

– वेगवान गोलंदाजीचा विभाग अपयशी ठरला. पॉवरप्ले आणि डावातील अखेरची षटके, जिथे टिच्चून मारा करणे अपेक्षित असते तिथेच पंजाबचे वेगवान गोलंदाज निष्प्रभ ठरले

– कॅगिसो रबाडा, सॅम करन आणि अर्शदीप यांनी षटकाला दहाच्या सरासरीने धावांची खैरात वाटली.

– गेल्या दोन सामन्यांत कर्णधार धवन फलंदाजीत अपयशी ठरतो आहे. त्याने पुढाकार घेत कामगिरी करणे अपेक्षित आहे

आज आयपीएलमध्ये

पंजाब किंग्ज वि. राजस्थान रॉयल्स

वेळ : सायंकाळी ७.३० पासून

ठिकाण : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, धरमशाला

प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा

आमनेसामने : एकूण सामने २५. राजस्थानचे विजय १४, पंजाबचे विजय ११

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! बेस्टच्या ताफ्यात ४० प्रीमियम एसी बस; काय आहेत सुविधा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here