मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष चौकशी समितीने ऑक्टोबर २०२१ मध्ये समीर वानखेडे यांची चौकशी केली होती. या चौकशीअंती सादर केलेल्या अहवालात ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत. या अहवालाच्या आधारे एनसीबीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे यांच्या संपत्तीचा चक्रावणारा तपशील नमूद करण्यात आला आहे.

समीर वानखेडे हे २०१७ ते २०२१ या काळात आपल्या कुटुंबीयांसोबत सहावेळा परदेशात फिरायला गेले होते. यामध्ये युके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवसारख्या ट्रिप्सचा समावेश आहे. या सगळ्या ट्रिप्सचा कालावधी एकत्र केल्यास समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय ५५ दिवसांपेक्षा अधिक काळ परदेशात होते. यासाठी ८.७५ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे समीर वानखेडे यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, एवढ्या पैशांमध्ये या सगळ्या देशांमध्ये जाण्याचा विमान प्रवासाचा खर्चही निघणे, अवघड आहे.

जुलै २०२१ मध्ये समीर वानखेडे आणि त्यांचा मित्र विरल राजन कुटुंबीयांसोबत मालदीव ट्रिपला गेले होते. याठिकाणी वानखेडे आणि विरल राजन यांचे कुटुंबीय आणि नोकर मालदीवच्या Taj Exotica रिसॉर्टमध्ये वास्तव्याला होते. याठिकाणी राहण्यासाठी वानखेडे कुटुंबीयांनी ७.५ लाख रुपये भरले होते. त्यानंतर वानखेडे यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची चौकशी सुरु झाल्यानंतर विरल राजन यांच्या क्रेडिट कार्डवरून रिसॉर्टचे उरलेले पैसे भरले होते.

समीर वानखेडेंनी मोठ्या टेचात ते वाक्य उच्चारलं, अवघ्या काही दिवसांत ग्रह फिरले; ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

२२ लाख रुपयांची रोलेक्सची घड्याळं

समीर वानखेडे यांनी विरल राजन याच्याकडून २२ लाख रुपयांची रोलेक्सची चार घड्याळं १७.४ लाख रुपयांना उधारीवर विकत घेतली होती. घड्याळ्यांच्या एका बिलावर २२.०५ लाख आणि दुसऱ्या बिलावर २०.५३ लाख अशी किंमत नमूद करण्यात आली होती. तसेच समीर वानखेडे यांनी विरल राजन याला चार घड्याळं विकली होती. यासाठी विरल राजनने ७.४ लाख रुपयांचा चेक वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्या नावावर जमा केला होता. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. समीर वानखेडे यांना विरल राजनने इतक्या लवकर विकलेल्या घड्याळ्यांचे पैसे कसे दिले आणि वानखेडे यांना विरल राजनने २२ लाख रुपये उधारीवर कसे दिले, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Sameer Wankhede: एनसीबी कार्यालयातील ‘त्या’ एका सेल्फीमुळे समीर वानखेडेंचा खेळ उघड झाला

मुंबईत अडीच कोटींचा फ्लॅट, वाशिममध्ये जमीन

समीर वानखेडे यांच्या मालकीचे मुंबईत चार फ्लॅटस आहेत. याशिवाय, वानखेडे यांची वाशिममध्ये ४.२ एकर इतकी जमीन आहे. याशिवाय, गोरेगाव येथे वानखेडे यांनी अडीच कोटी रुपयांना पाचवा फ्लॅट विकत घेतला होता. या फ्लॅटसाठी वानखेडे यांनी ८२.९० लाखांचा अतिरिक्त खर्च केल्याची माहिती एनसीबीच्या चौकशीत पुढे आली होती. आपली पत्नी क्रांती रेडकर हिने लग्नापूर्वी २०१७ साली फ्लॅटमध्ये १.२५ कोटी गुंतवले होते, असेही वानखेडे यांच्याकडून सांगण्यात आले. समीर वानखेडे यांनी त्यांच्या संपत्तीचा दिलेला तपशील आणि मूळ कागदपत्रांच्या माहितीमध्ये बरीच तफावत असल्याचे समोर आले आहे. समीर वानखेडे यांनी विरल राजन याच्याकडून ५.६ लाखांचे कर्जही घेतले होते. त्याबाबतही त्यांनी एनसीबीला माहिती दिली नव्हती.

समीर वानखेडेंनी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी मागितल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here