देशांतर्गत बाजारात आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवसाच्या सुरुवातीला अदानी समूहाचे शेअर्सची वाटचाल कमजोर झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल समोर येताच शेअर्सनी रॉकेट स्पीड पकडली.
अदानी शेअर्स अप्पर सर्किटला
व्यवहार सत्रात अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये दुपारी १ वाजल्यानंतर वाढ दिसून आली. दोन्ही शेअर्स ५% वाढीसह अप्पर सर्किटला धडकले. अदानी पॉवर २३६.३० रुपयांवर तर अदानी ग्रीन ९०३.५५ रुपयांवर व्यवहार करत होता. याशिवाय अदानी विल्मरमध्येही बरीच वाढ झाली आणि स्टॉक ७.५४% उसळी घेत ४०६.५० रुपयांवर पोहोचला असताना ४०३.९५ रुपयांवर क्लोज झाला.
अदानी ट्रान्समिशनही अप्पर सर्किटला
दुसरीकडे, अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ४.२७% वाढून १,९७०.७० रुपयांवर पोहोचला. तर अदानी पोर्टच्या शेअर्स ३.३६% वाढीसह ६८७.३० रुपयांवर पोहोचला असताना अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्येही तेजी दिसून येत असून तो ५% वाढीसह अप्पर सर्किटला धडकला. याशिवाय सिमेंट कंपनी ACC चे शेअर्स देखील १.५६% वाढीसह १,७३९.१० वर, अंबुजा सिमेंटचे शेअर्सही १.६८ टक्क्यांनी चढले तर अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये १.३३% वाढ नोंदवली गेली.
बाजारातही तेजीचे वारे
दुसरीकडे, देशांतर्गत शेअर बाजारातही आज तेजीने व्यवहार झाला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २४७.०६ अंक वाढून ६१,६७८.८० अंकांवर व्यवहार करत असताना ट्रेडिंग सत्रादरम्यान सेन्सेक्स ६१,२५१.७० अंकांवर पोहोचला होता. म्हणजे सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकावरून आज सुमारे ४२७.१ अंकांवर उसळी घेतली.