कोल्हापूर येथील स्वागत तोडकर या नॅचरोपॅथीची पदवी असलेल्या व्यक्तीने आयुर्वेदक औषध तयार करून ते तालुक्यातील औषध दुकानात विक्रीसाठी ठेवल्याची तक्रार आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय समितीचे सदस्य गणेश बोऱ्हाडे यांनी केली होती. त्यानुसार संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे यांनी संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांना दिला. हे प्रकरण घारगाव येथील असल्याने डॉ. घोलप यांनी घारगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याता आदेश दिला. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नव्हता. याप्रकरणी औषध विक्रेत्याची चौकशी करायची आहे, त्यानंतर निर्णय होईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तक्रारदार बोऱ्हाडे फेसबुकवर जाहिरात पाहून हे प्रकरण उघडकीस आणले आहे. हे स्वागत तोडकर यांचे औषध असून ते घारगाव येथील श्री, गुरूदत्त मेडीकल स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याची जाहिरात सोशल मीडियात करण्यात येत होती. प्रतिकारशक्ती वाढीसाठी हे औषध उपयुक्त असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. हे आयुर्वेदिक औषध असले तरी नॅचरोपॅथीच्या पदविकाधारकाला त्यासाठी परवानगी नाही. शिवाय तोडकर याच्याविरूद्ध यापूर्वीच संगमनेरसह आणखी काही ठिकाणी बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे हाही गुन्हा असल्याने कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे.
त्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन कारवाई सुरू झाली खरी, मात्र ती चौकशीच्या पातळीवर अडकली आहे.
करोनाच्या काळात आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. करोना उपाययोजनांमध्ये बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करणे याचाही समावेश करण्या आलेला आहे. याशिवाय करोनामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा गैरफायदा घेत फसवे दावे करणाऱ्या औषधांवरही लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेरचे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा याप्रकरणी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलेले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times