घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे. चिमुरडीच्या अकाली निधनानं कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

 

jalgaon news
जळगाव: घरात सुरु असलेल्या कूलरमुळे शॉक लागून नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगरात हा दुर्दैवी प्रकार घडला. वैष्णवी चेतन सनान्से असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शुक्रवारी वैष्णवीचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. रात्री आठ वाजता वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या अकाली निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगरात चेतन सनान्से परिवारासह वास्तव्यास आहेत. चेतन सनान्से यांचे सलून आहे. ते महाराज म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. चेतन सनान्से यांची मुलगी वैष्णवीचा शुक्रवारी वाढदिवस होता. शाळेला सु्ट्टी असल्याने वैष्णवी मलकापूर येथे तिच्या मावशीकडे गेली होती. वाढदिवस असल्याने तिला शुक्रवारी मुक्ताईनगर येथे तिच्या घरी आणण्यात आले होते. वैष्णवीच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु होती. तिच्यासाठी केक, नवीन कपडे आणण्यात आले होते. घरात स्वयंपाकाची लगबग सुरु होती.
तूच किरण, तूच अंधार! मैत्रिणीला संपवून तरुणाचं टोकाचं पाऊल; लॅपटॉपमध्ये २३ मिनिटांचा VIDEO
वैष्णवी तिचे काका लखन सनान्से यांच्या घरी गेली होती. तिथून ती तिच्या घरी आली. घराबाहेर चप्पल काढताना तिला कूलरचा शॉक लागला. विजेच्या धक्क्याची तीव्र जास्त होती. वैष्णवी जागीच कोसळली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर वीज पुरवठा खंडित करुन वैष्णवीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैष्णवीची प्राणज्योत मालवली होती.
पोरांना वाटलं पप्पा झोपलेत, वडिलांनी जग सोडलेलं; फलाटावरील चिमुकल्यांची हृदयद्रावक कहाणी
वाढदिवशीच काळाने वैष्णवीचा घात केला
आठ वाजता केक कापून वैष्णवीचा वाढदिवस साजरा केला जाणार होता. तिला नवीन कपडेसुद्धा आणले होते. मात्र वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या आई, वडिलांसह इतर कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. वाढदिवस झाल्यानंतर शनिवारी वैष्णवी तिच्या आई वडिलांसह केदारनाथ, बद्रिनाथ येथे दर्शनासाठी जाणार होती. त्यासाठी सामानाची बांधाबांधसुद्धा झाली होती. मात्र सकाळ उजाडण्यापूर्वीच अनर्थ घडला. वैष्णवीच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैष्णवी दुसरीत उत्तीर्ण होऊन तिसरीत गेली होती. तिच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, आजी , बाबा, काका, काकू, चुलत भावंडे असा परिवार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here