मोदी २००० रुपयांच्या नोटांना व्यवहार्य चलन मानत नाहीत
मिश्रा म्हणाले, “पंतप्रधान मोदींचे असे म्हणणे होते की २,००० रुपयांची नोट ही दैनंदिन व्यवहारासाठी व्यावहारिक चलन नाही. याशिवाय या नोटांमुळे काळा पैसा आणि करचुकवेगिरीलाही मदत होते. पंतप्रधानांनी लहान नोटांना नेहमीच व्यावहारिक चलन मानले आहे, असे मिश्रा म्हमाले. ते पुढे म्हणाले की, ‘२,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने पंतप्रधानांचा मॉड्यूलर बिल्डिंगचा दृष्टिकोन दिसून येतो. त्याची सुरुवात २०१८-१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईवर बंदी घालण्यात आली. यानंतर, ते हळूहळू चलनाबाहेर गेले आणि आता ३० सप्टेंबर २०२३ रोजी ते पूर्णपणे चलनाबाहेर जाईल.
२०१८-१९ मध्येच बंद करण्यात आली नोटांची छपाई
२०१८-१९ मध्येच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबली होती, असे आरबीआयने शुक्रवारी जाहीर केले होते. दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २ (१) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा चलनात आल्या. ५००, २०० आणि १०० च्या छोट्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यावर या २००० रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याचा उद्देशही पूर्ण झाला.
नोटाबंदीपेक्षा वेगळा आहे हा निर्णय
२,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय नोटाबंदीपेक्षा वेगळा आहे. वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी ही माहिती दिली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीपेक्षा हा निर्णय वेगळा असल्याचे ते म्हणाले. तसेच याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. ३० सप्टेंबरपर्यंत नोटा जमा न केल्याबद्दल विचारले असता, सोमनाथन म्हणाले की, बँकांकडे त्यावर व्यवहार करण्यासाठी योग्य व्यवस्था असेल.