भावेश आणि यश दोघेही दुचाकीने भरधाव वेगात मार्गताम्हाणेकडून चिपळूणच्या दिशेने जात असताना त्यांचा गाडीवर ताबा सुटला आणि गाडी मोरीच्या कठड्यावर जोरदार आदळली. एका अवघड वळणावर झालेल्या अपघातात दोन्ही भावांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी लाईफकेअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर काही वेळाने दुसऱ्याचाही मृत्यू झाला.
यश आणि भावेश हे दोघेही मार्गताम्हने येथे आपल्या मामाकडे म्हणजे आपल्या आजोळी राहायला होते. भावेश आणि यश हे दोन भाऊ आपल्या आई-वडिलांसह येथे राहत होते. मार्गताम्हने येथील नातू महाविद्यालयामध्ये ते दोघेही शिक्षण घेत होते. या दोन्ही भावांच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे मार्गताम्हने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचा मृतदेह पाहून त्यांची आई देखील ढसाढसा रडली. त्यांचे मृतदेह कामथे रुग्णालयात शविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांना खेड तालुक्यातील सार्पिली येथे त्यांच्या मूळगावी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्या धक्कादायक प्रकाराने चिपळूण तालुक्यात मार्गताम्हने येथे तर खेड तालुका सार्पिली परिसरातही शोककाळा पसरली आहे.
दरम्यान, भावेश हा मुंबईला नोकरीला असून सध्या तो गावाला आला होता. तसेच यश हा वाहने दुरुस्तीचे काम शिकत होता. यशने यावर्षी १२ वीची परिक्षा दिली होती. दोघेही भावांचे वाढदिवसही मे महिन्यातच होते. भावेशचा वाढदिवस ६ मे रोजी झाला होता तर यशचा वाढदिवस २६ मे रोजी होता. यश हा अभ्यासात खूप हुशार होता. दरम्यान, या हृदयद्रावक अपघाताची चिपळूण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.