पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, पीडित कुटुंब विजयवाड्याचे आहे. त्यांनी एक कार भाड्याने घेतली होती आणि ते शहरात फिरत होते. चालकासह गाडीत सात जण होते. अंडरपासमध्ये वाहनांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेड लावण्यात आले होते. मात्र पावसामुळे बॅरिकेड कोसळले होते. चालकाला अंडरपास टाळता आला असता. तरीही, त्याने त्यात प्रवेश केला, असेही ते म्हणाले.
गाडी अंडरपासमध्ये गेल्यावर पाण्याची पातळी कारच्या खिडकीच्या काचेच्या पातळीपर्यंत वाढली. त्यामुळे प्रवाशांना दरवाजे उघडता आले नाहीत. अखेर भानुरेखाचा बुडून मृत्यू झाला. तिला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. विधानसौधा आणि विकाससौधाजवळ असलेल्या केआर सर्कल येथील अंडरपास जवळपास सात ते आठ मीटर खोल आहे.
ड्रायव्हर हरीशच्या म्हणण्यानुसार, कब्बन पार्कला भेट दिल्यानंतर पाऊस थांबल्यावर संबंधित कुटुंबाने बायरठी नगर, होसूर रोडला परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही अंडरपासमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोन वाहने – एक कार आणि एक रिक्षा आत गेली होती. आमच्या गाडीच्या पुढे असलेला दुसरा रिक्षा चालक थांबला आणि त्याने मला पुढे जायला सांगितले, असं कार चालक म्हणाला.
पाण्याने भरलेल्या अंडरपासमध्ये कार अडकल्याने एक-दोन मिनिटांतच इंजिन बंद झाले. स्थानिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले पण वाहनातील लोक घाबरून आरडाओरडा करु लागले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अंडरपासमधून बाहेर काढण्यासाठी शिड्या उतरवण्यात आल्या. “सहा जणांना वाचवण्यात आले, तर महिलेच्या नाकातोंडात प्रचंड पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला” असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.