खाली उतरल्यानंतर ते गाडी चेक करु लागले. त्याचवेळी एका भरधाव येणाऱ्या टिप्परने मागून जोरदार दोघांना धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. कल्पना रमाकांत कड्यालवार आणि साहिल रमाकांत कड्यालवार अशी मृतकांची नावे आहेत. दोघांना धडक दिल्यानंतर या टिप्परने कारला देखील धडक दिली. कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, टिप्परने ज्या कारला धडक दिली त्या कारमध्ये साहिलचे वडिल आणि मोठा भाऊ समीर होता. हा भीषण अपघात शनिवारी दि.२० मे रोजी मध्यरात्री १२ वाजेनंतर घडला.
काय आहे संपूर्ण घटना?
सिंदेवाही येथील रमाकांत कड्यालवार आपल्या कुटुंबासोबत नागपूरला गेले होते. त्यांनी नागपुरात बुलेट गाडी विकत घेतली आणि ते भिवापूर मार्गे सिंदेवाहीला परत निघाले. बुलेटने आई कल्पना आणि मुलगा साहिल निघाला. तर कारने वडील रमाकांत आणि मोठा मुलगा समीर निघाला होता. नागपूर येथून निघाल्यावर बुलेट दोनदा बंद पडली. त्यानंतर नागभीड – तळोधी मार्गांवरील बोकडडोह पुलावर तिसऱ्यांदा बुलेट बंद पडली.
आई आणि मुलगा बुलेटला काय झालं हे बघत असताना पाठीमागून वडील आणि भाऊ कार घेऊन त्यांच्याजवळ येऊन थांबले. नेमके त्याचवेळी भरधाव येणाऱ्या टिप्परने मागून बुलेट आणि कारला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलगा आणि आई पुलाखाली फेकले गेले आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये असलेले रमाकांत कड्यालवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनं गोंधळलेल्या समीरने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी नागभीडला हलविले. या अपघाताप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.