मुंबई: मुलाच्या मृत्यूचं दु:ख पचवून विरारमध्ये राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्यानं त्यांच्या ३० वर्षीय मुलाचे अवयव दान करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. डॉक्टर दाम्पत्याच्या मुलाचा बंगळुरुत अपघाती मृत्यू झाला. विशेष म्हणजे तरुणाच्या नवविवाहित पत्नीनंदेखील याला संमती दर्शवली. तरुणाच्या अवयव दानामुळे ११ जणांना नवं आयुष्य मिळणार आहे. डॉक्टर दाम्पत्यानं घेतलेल्या निर्णयाचं सगळ्यांकडून कौतुक होत आहे.पेशानं इंजिनीयर असलेला ३० वर्षीय साकेत दंडवते १५ मे पुण्याहून बंगळुरुला बाईकनं निघाला होता. साकेत बंगळुरुमधील डिजिटल ऍप कंपनीत कार्यरत होता. चित्रदुर्ग परिसरात त्याच्या बाईकला एका अज्ञात वाहनानं धडक दिली. साकेतनं हेल्मेट घातलेलं होतं. जखमी झालेल्या साकेतला वाटसरुंनी रुग्णालयात दाखल केलं. त्यांनी साकेतचे वडील डॉ. विनित आणि आई डॉ. सुमेधा यांच्याशी संपर्क साधला. जखमी अवस्थेतील साकेतला अनेकांनी मदत केली. त्याला कारमधून रुग्णालयात नेण्यात आलं. साकेतचे कुटुंबीय येईपर्यंत झालेला वैद्यकीय खर्चदेखील काहींनी उचलला. साकेतच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्याला बंगळुरुतील नारायण रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी साकेतनं अखेरचा श्वास घेतला. साकेतच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.पेशानं डॉक्टर असलेल्या साकेतच्या आई, वडिलांनी मुलाच्या निधनाचं दु:ख काहीसं दूर सारत मोठ्या मनानं अवयव दानाचा निर्णय घेतला. साकेतचं यकृत, किडनी, डोळे, त्वचा दान करण्याचं त्यांनी ठरवलं. साकेतची पत्नी अपूर्वानंदेखील यासाठी सहमती दर्शवली. अवघ्या ५ महिन्यांपूर्वच साकेत आणि अपूर्वा यांचा विवाह झाला होता. अपूर्वादेखील साकेतप्रमाणेच बंगळुरुतील आयटी सेक्टरमध्ये काम करते. शुक्रवारी बंगळुरुमध्येच साकेतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दंडवते कुटुंबाला अवयव दानाची पार्श्वभूमी असल्याचं डॉक्टर दाम्पत्याच्या मित्र परिवारानं सांगितलं. ‘दंडवते कुटुंब पुरोगामी विचारांचं आहे. याआधीही त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी अवयव दान केले आहेत. साकेतच्या आजी, आजोबांचे अवयवही दान करण्यात आले होते. साकेतनंदेखील अवयव दानाची इच्छा बोलून दाखवली होती,’ असं विनीत आणि सुमेधा यांच्या डॉक्टर मित्रानं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here