सोन्या-चांदीचा आजचा भाव
सध्या राज्यात लग्नसराईची धामधूम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची जोरदार मागणी असते. तसेच सोन्या-चांदीच्या दराच्या दरवाढीलाही ब्रेक लागला आहे. २२ मे २०२३ रोजी भारतात सोन्याचा भाव ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर राहिला मात्र, सोमवारी दरात किंचित घसरण झाली. देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत उलथापालथ होताना दिसत आहे.
देशांतर्गत फ्युचर्स मार्केट म्हणजेच MCX वर सोन्याची किंमत सुमारे १०० रुपयांनी स्वस्त झाली असून या घसरणीमुळे सोन्याचा भाव ६० हजार २९० रुपये प्रति १० ग्रॅम या दरावर व्यवहार करत आहे. तसेच चांदीही सुमारे चारशे रुपयांनी स्वस्त झाली आहे. MCX वर एक किलो चांदीची किंमत ७२,९४३ रुपयांवर पोहोचली आहे. जागतिक संकेतांमुळे सोने-चांदीच्या किमतीत गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे.
अमेरिकन बाजारात सोने-चांदीत नरमाई
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. कोमॅक्सवर सोन्याचा भाव किंचित घसरून प्रति औंस $१९८० वर तर चांदी देखील २४ डॉलरच्या प्रति औंसच्या खाली घसरली आहे. सध्या चांदीचा भाव प्रति औंस $२३.९० वर व्यापार करत आहे. यूएस फेडरल रिझर्व्हची आगामी बैठं आणि व्याजदर कोमॅक्सवरील नरमाईचे कारण मानले जात आहे. अमेरिकेच्या कर्ज मर्यादेच्या चर्चेला अद्याप फळ मिळालेले नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत, तर फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानांनी सोन्याच्या दरवाढीला दुजोरा दिला आहे.