मेळघाटातील जंगलात गस्त करत असताना महिला वनरक्षक राणी गरुड यांना रक्तबंबाळ अवस्थेत दुर्मिळ जातीचा शृंगी घुबड दिसून आला. प्राथमिक सेवासुश्रृषा आटपून त्यास परतवाड्यातील शासकीय डिस्पेंसरी येथे पुढील उपचारार्थासाठी हलविण्यात आले आहे. प्रादेशिक मेळघाट वनवृत्तांर्गत येणाऱ्या धारणीच्या आरएफओ यांच्या मार्गदर्शनात रात्रकालीन जंगल गस्तीसाठी एक ‘विशेष महिला पथक तयार करण्यात आले असून गस्त पथक प्रमुख वनरक्षक राणी गरूड, वनरक्षक प्रियंका खेरडे, वनरक्षक माला धान्डे तथा काही निवडक वनमजुर चित्री वर्तूळातून रात्री रात्रकालीन जंगल गस्त करीत होते.
यादरम्यान कोठा नियतक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वनखंड क्रमांक १२८६ मधून गस्त पथक प्रमुख राणी गरूड यांच्या पथकास एक शृंगी घुबड जमीनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल. त्यामुळे वनरक्षक राणी गरूड यांच्याकडून ही माहीती वनपरिक्षेत्राधिकारी यांच्यापर्यंत पुरविण्यात आली. घुबडाचा जीव वाचवून बचाव कार्य हाती घेण्यासाठी लगेच त्यास धारणी येथे आणून पशुसंवर्धन खात्याचे पशु चिकित्सक डॉ. मनोज आडे यांचा वैद्यकीय सल्ला मिळवून जखमी शृंगीवर प्राथमिक सेवासुश्रूषा धारणी येथेच आटपून घेण्यात आली. त्यानंतर जखमी अवस्थेत सदर शृंगीस परवाड्याच्या ‘शासकीय डिस्पेंसरी तथा रेस्क्यू टिम’ ( वन्यप्राणी बचाव पथक ) यांच्या सुपूर्द देण्यात आले आहे
वैद्यकीय सूत्रांकडून पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार शृंगी’ ( घुबडाचा ) च्या डाव्या खांद्यांवर गंभीर दुखापत असून त्याच एक हाड मोडल्यामूळे पंखाची हालचाल मंदावली आहे. परिणामी शृंगी अवकाश अथवा एका स्थळापासून दुसर्या स्थळपर्यंत भरारी घेण्यात तो असमर्थ असून त्यावर तातडीचा उपचार सुरू करण्यात आला आहे. तर येत्या काही दिवसांत जखमी शृंगी घुबड हा लवकरच बरा होईल, व त्यानंतर तो आपल्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा झेप घेईल असा आशावाद धारणीच्या वनपरिक्षेत्राधिकारी व्यक्त केला. रेस्क्यू टिम’ प्रमुख डॉ. वैभव हागोणे तथा डॉ. धंदर वैद्यकीय उपचार पुरवून त्यास जीवनदान देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.