अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक विवाह सोहळा अगदी रंगात आला होता…दोन्ही बाजूकडील नातेवाईकांच्या गर्दीने मंगल कार्यालय खचाखच भरले होते…लग्न घटिका समीप आली होती, मात्र अचानक विवाहस्थळी पोलिसांची एंट्री झाली आणि नवरदेव बोहल्यावर चढण्याऐवजी थेट जेलमध्ये गेला. त्यामुळे या घटनेची जिल्हाभरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अहमदनगरच्या राहाता येथील एका मुलीचा विवाह नाशिक शहरात राहणाऱ्या पंकज याच्याशी ठरला होता. २१ मे रोजी राहाता येथील मंगल कार्यालयात या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्न घटिका समीप आल्याने दोन्ही बाजूकडील नातेवाईक आणि मित्र परिवाराचा उत्साह शिगेला होता. नवरदेव पंकज वाजतगाजत विवाहस्थळी पोहचला. मात्र तो बोहल्यावर चढण्याआगोदरच त्याची प्रियसी राहाता पोलिसांसह विवाहस्थळी पोहचली.

भीषण उन्हात पोरांना आई कारमध्ये विसरली, १५ तासांनी आठवलं, तोपर्यंत २ वर्षांच्या चिमुरडी…

पंकज याने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत वारंवार शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे तिने सांगताच विवाहस्थळी एकच खळबळ उडाली. पंकजचे कारनामे ऐकून नवरीसह तिच्या घरच्यांचा पारा चांगलाच चढला आणि नवरीने तात्काळ विवाहास नकार देत हा विवाह रद्द केला. राहाता पोलिसांनी पंकज याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तरुणीशी संबंध असल्याची कबुली दिली. तक्रारीपूर्वी कलवरे, कलवऱ्या यांच्या गराड्यात असणारा नवरदेव पोलीस स्टेशनला मात्र एकटाच दिसत होता.

पीडितेच्या फिर्यादीवरून पंकज याच्यावर भादंवि कलम ३७६ आणि ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता नाशिकरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पंकज याला देखील नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

दरम्यान, पंकजने आगोदर प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्ष तिची फसवणूक केली, तर राहाता पोलीस वेळीच विवाहस्थळी पोहचल्याने दुसरी मुलगी फसवणूक होण्यापूर्वी वाचली आणि बोहल्यावर चढण्याआधीच पंकजवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली. त्यामुळे प्रेमसंबंध किंवा ‘शुभमंगल’ जुळवताना ‘सावधान’ राहा अन्यथा असे ठगसेन तुमचीही फसवणूक करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here