ज्यांच्याकडे २,००० रुपयांच्या नोटांच्या रूपात काळा पैसा आहे, ते कोणत्याही जन धन खातेधारकाचा वापर करून त्यांच्या नोटा बदलून घेऊ शकतात, अशी भीती इन्कम टॅक्स विभागाला आहे. त्यामुळे अशा खात्यांच्या छाननीची तयारी सुरू आहे.
खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास काय?
सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार त्यांना प्राप्तिकर विभागाकडून सूचना येत असतात. त्यामुळे जन धन खात्यावर विशेष लक्ष ठेवले जाते. आणि जन धन खात्यात ‘संशयास्पद’ व्यवहार असल्यास त्याची नोंद केली जाते. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही (AI) वापर करण्यात येणार असल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. त्यांच्यानुसार काळा पैसा गोळा करणारे त्यांच्या २,००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी अशाच प्रकारचे डावपेच अवलंबू शकतात.
प्रामाणिक लोकांना नाही होणार त्रास
याशिवाय जर कोणाच्या घरी २००० रुपयांच्या काही नोटा पडून असतील आणि ते बँकेच्या शाखेत जमा करण्यासाठी आल्यास त्यांची चौकशी केली जाणार नाही, असेही आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले. पण जर गरीब किंवा सामान्य वर्गातील व्यक्तीने मोठ्या संख्येत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या अशा व्यक्तीची चौकशी होऊ शकते. आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी बँका, आयकर अधिकारी आणि इतर काही एजन्सीदेखील पूर्ण सतर्क आहेत.
उल्लेखनीय आहे की मागील काही वर्षांपूर्वी समाजातील उपेक्षित लोकांना बँक नेटवर्कशी जोडण्यासाठी किंवा आर्थिक समावेशासाठी जन धन खाती उघडण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. सध्या देशातील बहुतांश गरीब कुटुंबांकडे किमान एक जन धन खाते आहे. तर काही स्वार्थी घटकांनी अशा खातेदारांच्या खात्याचा गैरवापरही केल्याचे दिसून आले आहे. अशा संशयास्पद खात्यांवर आयकर विभाग लक्ष ठेवून असते.