तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन २००० रुपयांची नोट जमा केली तर त्यावर कोणतेही बंधन नाही, परंतु तुमच्या खात्याचे केवायसी असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेचे ग्राहक नसले तरीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. तुम्ही एकावेळी फक्त २० हजाराच्या १० नोटा बदली करू शकता. नोटा बदलण्याची प्रक्रिया २३ मे २०२३ पासून म्हणजेच आज सुरू होत आहे.
नोटा कुठे बदलू शकतो?
तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. यासोबतच तुम्ही आरबीआयच्या १६ प्रादेशिक कार्यालयात जाऊन नोट बदलून घेऊ शकता. आरबीआयने सांगितले की, दुर्गम भागात, म्हणजे ज्या भागात बँक नाही किंवा लांब अंतरावर बँक आहे, तेथे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही.
घरबसल्या नोटा कशा बदलायच्या?
तुम्ही घरी बसूनही नोटा बदलू शकता. तुम्हाला बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून नोटा बदलून घेऊ शकता. बँक मित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्ही दररोज ४,००० रुपये किंवा २,००० रुपयांच्या दोनच नोटा बदलू शकता.
बनावट नोटांचं काय होणार?
बँकेकडे कोणत्याही प्रकारे २००० रुपयांची बनावट नोट आढळल्यास बँक ती जप्त करेल. त्या नोटेचे कोणतेही मूल्य ग्राहकाला दिले जाणार नाही. ४ पेक्षा जास्त बनावट नोटा आढळून आल्यास बँक अधिकारी त्या नोटा पोलिसांच्या ताब्यात देतील. पोलीस त्याचा तपास करतील. बँक नोट सॉर्टिंग मशिन्सद्वारे (एनएसएम) नोटांची तपासणी करेल.
नोट का बंद झाली?
दोन हजार रुपयाची नोट चलनात आल्यानंतर ही नोट का बंद केली जात आहे, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे की, या नोटा बाजारात कमी वापरल्या गेल्या असून बाकीच्या नोटांच्या तुलनेत त्याचे चलन कमी होते.