म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत अटीतटीची सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटातील संचालकाने भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. तर उपसभापतीपद शिवसेनेला मिळाले. ऐनवेळी झालेल्या भाजप प्रवेशामुळे भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीवरील १५ वर्षांपासूनचा काँग्रेसचा बुरूज भाजपने उद्ध्वस्त केला. सभापतीपदावर भाजपमध्ये गेलेले विवेक नखाते यांची निवड झाली तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते यांची निवड झाली.भंडारा बाजार समितीत १८ पैकी ९ संचालक काँग्रेस समर्थित तर राष्ट्रवादी-भाजपा-शिंदे गटाचे सहा संचालक तसेच तीन अपक्ष निवडून आले होते. निवडून आलेल्या तीनही अपक्षांवर राष्ट्रवादी-भाजपा-शिंदे गटाने दावा ठोकल्याने दोन्ही गटांचे संख्याबळ ९ विरुद्ध ९ असे झाले होते. बहुमतासाठी एका संचालकाच्या पाठिंब्याची गरज होती. त्यासाठी दोन्ही गटांकडून प्रचंड आटापिटा सुरू होता. दरम्यान, गेल्या १५ वर्षांपासून सभापती असलेले काँग्रेसचे रामलाल चौधरी यांच्या गटातील विवेक नखाते यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे रामलाल चौधरी गटाकडे ८ संचालक आणि राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गटाकडे १० संचालक होते.
पवार साहेब आता पुन्हा अॅक्टिव्ह झाल्यानं काहींची खरच अडचण झाली आहे; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
सभापती आणि उपसभापतीपदाकरिता रविवारी निवडणूक झाली. सभापतीपदासाठी काँग्रेसच्या गटातून रामलाल चौधरी तर राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना गटाकडून विवेक नखाते तसेच उपसभापतीपदासाठी काँग्रेस गटातून नितीन कडव आणि राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना गटाकडून नामदेव निंबार्ते रिंगणात होते. सभापतीपदाच्या निवडणुकीत विवेक नखाते यांना १० मते तर रामलाल चौधरी यांना ८ मते मिळाली. तर उपसभापती निवडणुकीत नामदेव निंबार्ते यांना १० तर नितीन कडव यांना ८ मते मिळाली. नखाते आणि निंबार्ते यांना विजयी घोषित करण्यात आले.
हा विजय कोणत्याही पक्षाचा नसून शेतकऱ्यांच्या हिताकरिता झालेल्या लढाईचा आहे. गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसचे एकछत्री राज्य असल्याने बाजार समितीचा विकास थांबला होता. त्यामुळे एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्ताबदल करणे गरजेचे होते, असे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
सभापती निवडणुकीच्या एक दिवसआधी विवेक नखाते या संचालकाचा भाजपात प्रवेश करविण्यात आला. सत्तेचा दुरुपयोग करून दबाव घालून वाटेल ते आमिष दाखवून नखाते या संचालकाला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती बनविला. अशा गद्दाराला जनता माफ करणार नाही, असे काँग्रेसचे माजी सभापती रामलाल चौधरी यांनी सांगितले.