म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमधील सखल भाग आणि पावसाळ्यात पाणी साठण्याचे ठिकाण अशी ओळख झालेल्या हिंदमाता परिसराची यंदा जलवेढ्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेने बांधलेल्या प्रमोद महाजन कला पार्कमधील भूमिगत टाकीची क्षमता दोन कोटी लिटरने वाढवण्यात येत असून त्याचे काम मे अखेरीस पूर्ण केले जाणार आहे. याशिवाय परळमधील झेवियर्स मैदानातील भूमिगत टाकीही उपलब्ध आहे.मुंबईतील सखल भागांत दरवर्षीच्या पावसाळ्यात पाणी साचते. त्याचा परिणाम रहदारीवर होतो. दादरमधील हिंदमाता परिसरात तर पावसाचे पाणी बराचवेळ साचून राहते. त्यामुळे वाहतुकीचेही तीन तेरा वाजतात. याशिवाय आजूबाजूच्या दुकान, वसाहतींमध्येही पाण्याचा शिरकाव होतो. दरवर्षीची ही स्थिती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतरही दिलासा मिळाला नाही. हिंदमाता परिसरात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यााठी भूमिगत टाक्या बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. हिंदमाता परिसरात साचणारे पाणी पंपांच्या सहाय्याने परळ येथील झेविअर्स मैदान व दादरमधील प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी सोडण्याची योजना तयार केली आणि हे पाणी साठवणासाठी भूमिगत टाक्या बांधण्याचे काम हाती घेतले. झेविअर्स मैदान येथे तीन कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेच्या भूमिगत टाकीचे काम गेल्या वर्षीच्या पावसाळ्याआधीच पूर्ण झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. तर प्रमोद महाजन कला पार्कमधील दीड कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे कामही गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आले होते. याच टाकीची क्षमता आणखी दोन कोटी लिटरने वाढवण्याचे कामही हाती घेण्यात आले. हे काम यंदाच्या मे अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दोन्ही भूमिगत टाक्यांची पाणी साठवण क्षमता एकूण साडेसहा कोटी लिटर होणार असल्याने पावसाळ्यात याचा मोठा दिलासा मिळेल. हिंदमाता परिसरात पाणी तुंबल्यास ते पंपाच्या सहाय्याने या टाकीत सोडले जाईल. त्यामुळे पाणी तुंबणार नाही आणि रहिवाशांसह वाहन चालकांनाही दिलासा मिळणार आहे’, असे सांगण्यात आले.

काँग्रेसचा संचालक फोडला, ‘नऊ’चे दहा करुन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत

१३० कोटी रुपयांचा खर्च

हिंदमाता परिसरामध्ये साधारण ७५ ते ८० मिलिमीटर पाऊस पडून पाणी साचले तर दोन भूमिगत टाक्यांची मदत घेणे शक्य होणार असल्याचे सांगितले. साधारण तीन ते चार तास यामध्ये पाणी साठवता येऊ शकते. प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणच्या भूमिगत टाकीचे काम मे अखेरीस पूर्ण होणार आहे. तर याची अन्य किरकोळ कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले. टाकी बांधण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण होणार असल्याने त्याचा वापर यंदाच्या पावसाळ्यात होणार आहे. दोन भूमिगत टाक्या बांधण्यााठी साधारण १३० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here