अशीच एक हृदयद्रावक घटना यादरम्यान घडली आहे. नागेश गणेश बोल्लू (वय २३, रा.सगन नगर, मुळेगाव रोड, विडी घरकुल, सोलापूर) आणि राज सुरेश गवळी (वय २१, रा.सगम नगर मुळेगाव रोड, विडी घरकुल, सोलापूर) या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात येऊन माहिती देताना सांगितलं की, रविवारी २१ मे रोजी दुपारी चौघे मित्र पोहायला गेले होते. मात्र, त्यांपैकी दोघेच मित्र परत आले आणि आलेल्या मित्रांनी देखील याबाबत माहिती दिली नाही. तलावाच्या परिसरात असलेल्या नागरिकांना सोमवारी दुपारी दोन तरुणांचे मृतदेह तरंगताना दिसले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आणि दोघा मित्रांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.
शासकीय रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी माहिती देताना सांगितलं की, रविवारी २१ मे रोजी सकाळी एका लग्न समारंभासाठी चौघे मित्र गेले होते. लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी येताना दुपारच्या सुमारास सोलापूर शहरालगत असलेल्या तळे हिप्परगा येथे चौघे मित्र पोहायला गेले होते. दोघा मित्रांना पोहायला येत असल्याने दोघांनी उड्या मारल्या. नागेश बोल्लू आणि राज गवळी या दोघांना पोहता येत नव्हते. तरी या दोघांनी देखील तलावात पोहण्याचा प्रयत्न केला. दोघांना तलावाच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि दुर्दैवाने नागेश आणि राज दोघेही बुडाले
सोमवारी दुपारच्या सुमारास तलावाशेजारी राहणाऱ्या नागरिकांना दोन मृतदेह तरंगत असताना दिसले. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. शासकीय रुग्णालयात असलेले रुग्णसेवक जहांगीर शेख यांनी राज गवळी आणि नागेश बोल्लू या दोघांचे मृतदेह तलावाबाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. नातेवाईकांना ही बाब कळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. चौघे मित्र गेले होते, मात्र दोघेच परत आले. परत आलेल्या दोघा मित्रांनी सोमवारी सायंकाळीच महिती देणे गरजेचे होते. यामागे संशयास्पद काहीतरी कटकारस्थान आहे का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.