वन विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा नागलेंच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. लाकडं जवळपास ७०० किलोमीटर दूर पाठवण्यात आली होती. त्यांची जप्तीसाठी पूजा नागलेंच्या पथकानं ५७ तास खास ऑपरेशन राबवलं. या प्रकरणात २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. महूपानीच्या जंगलात महिन्याभरापूर्वी सागवानाची २२ झाडं कापण्यात आली. या प्रकरणाचा तपास वन विभागाकडून सुरू होता. पूजा यांच्यासोबत १२ जण यावर काम करत होते.
तपासाच्या सुरुवातीला भुरा नावाच्या चालकाचं नाव समोर आलं. भुरा खंडवामध्ये होता. त्याला पकडून बैतुलला आणण्यात आलं. हरदामधील विष्णोई गँगनं महूपानीमधील सागवान राजस्थानच्या भिलवाड्यात पाठवल्याचं भुरानं सांगितलं. दिवसा झाडांवर खुणा करण्यात येतात आणि मजूर रात्री येऊन काही तासांमध्ये ती झाडं कापतात. मग त्यांना ट्रकमध्ये टाकण्यात येतं, अशी माहिती भुरानं दिली.
‘बेतूलपासून ७०० किलोमीटर दूर असलेल्या भिलवाड्यात सागवान पोहोचवण्यात आल्याचं भुरानं सांगितलं. रस्त्यात कित्येक नाके आणि वन विभागाचे बॅरिकेड्स असताना ट्रक इतक्या दूर कसे गेले, असा प्रश्न आम्हाला पडला. लाकडं जप्त करण्यासाठी इतक्या दूर कसं जायचा हादेखील सवाल होता. पण वरिष्ठांनी मला लाकडं जप्त करण्याची परवानगी दिली. ११ मे रोजी १३ जणांचं पथक बैतूलसाठी निघाली. १२ मे रोजी आम्ही भिलवाड्याच्या हरिपुरा गावात छापा टाकण्यात आला. तिथे अवैध लाकडं विकण्यात आली होती,’ असं पूजा यांनी सांगितलं.
छापा टाकताच लाकडं कापणारे मजूर पळू लागले. लाकडं कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचा मालक रामेश्वर सुतारला बोलावलं असता त्यानं सुरुवातीला आम्हालाच धमकी दिली. मात्र पथकानं मागे हटण्यास नकार दिला. अखेर त्यानं आत्मसमर्पण केलं. आपण गोकुळ विश्नोईकडून ७ लाख रुपयांना लाकडं खरेदी केल्याचं त्यानं सांगितलं. जप्त करण्यात आलेल्या लाकडाची किंमत १२ लाख रुपये आहे.