आज तू चेन्नईमधून आपली निवृत्ती जाहीर केलीस. तू आयपीएलच्या तयारीत गुंतला असशील, असंच सर्वांना वाटत होतं. त्यामुळे तु आत्तातरी निवृत्तीचा निर्णय घेणार नाहीस, असेच वाटले होते. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करशील आणि भारतीय संघात पुन्हा मानाने परतशील, असं सर्वांच्याच मनात होतं. कारण तुला पुन्हा एकदा भारताच्या जर्सीमध्ये पाहायचे होते, ते आता राहूनच गेले. आता तू फक्त आम्हाला चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीत दिसशील, पण तेही किती वर्षे माहिती नाही.
तुझ्या बऱ्याच आठवणी मनात अजूनही ओल्या आहेत, त्यांचे नेहमीच स्मरण होत राहील. भारतीय संघात येण्यापूर्वी तू पोलिस जिमखान्याला एक धडाकेबाज खेळी खेळला होतास. तेव्हा षटकारांची बरसात तू केली होतीस. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर तिथेच होते आणि तु आता भारतीय संघात दिसणार, हे आम्हाला तिथेच कळले होते. तेव्हाची तुझ्याबरोबरची भेट अजूनही माझ्या स्मरणात आहे.
तु भारताला एकमेव ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिला होतास. हा विश्वचषक जिंकल्यावर तू आपली जर्सी एका लहान मुलाला घातली होतीस. त्यावेळी आता युवागिरीचे राज्य सुरु झाले आहे, असेच तुला कदाचित म्हणायचे असेल. खरंच नशिबवान होता तो मुलगा. त्यानंतर तुझी तुलना तर चक्क मिडास राजाबरोबर केली जायची. कारण तु कर्णधार झाल्यावर प्रत्येक सामन्याचे सोने करत होतास. विजय आणि नशिब या दोन्ही गोष्टी तुझ्या हातात हात घालून वावरत होत्या. संघातील वरिष्ठ खेळाडूंचा तू एकामागून एक काटा काढला, असेही तुझ्यावर आरोप केले गेले. पण यापूर्वीच्या काही कर्णधारांनी संघाची मोट बांधताना या गोष्टी केलेल्या होत्या, त्यामुळे तुझे हे वागणे नवीन नव्हते.
तुझे अनेक प्रताप पाहायला मिळाले. तुझ्या फलंदाजीमध्ये तंत्रशुद्धता नव्हती. मी चांगला फलंदाज नाही, हे तु स्वत: बऱ्याचदा म्हटला होतास. पण तरीही दहा हजार धावांचा पल्ला तू पूर्ण केलास, त्यामुळे तुझ्या फलंदाजीबाबत काय बोलणार… अखेरच्या षटकापर्यंत सामना नेऊन तो जिंकवायचा, असे क्रिकेटच्या मैदानात बॉलीवूडला साजेसे सिनेमे तु आम्हाला बऱ्याचदा दाखवले.
चक्र जसं फिरतं, तसं तुझं नशिबही बदललं. विराट कोहली तुझ्यानंतर भारताचा कर्णधार झाला. पण मैदानात मात्र तूच नेतृत्व करताना दिसायचास. वय आणि होणारी टीका यामुळे तु निवृत्ती घेणार हे माहिती होतेच. पण मैदानात खेळाडूंनी खांद्यावर उचलून जर तुला निरोप दिला असता तर ते अजून आवडलं असतं. कदाचित प्रसिद्धीपासून दूर राहण्याचे तंत्र तू निवृत्तीच्यावेळीही वापरले. त्यामुळेच तू असं करायला नको होतंस, असं वाटतं आहे. पण योग्यवेळी तू क्रिकेटचा सन्मान राखून निवृत्ती घेतलीस, हे योग्यच केलंस…
तुझा एक चाहता
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times