धोनी मॅजिक आणि सगळे फेल
चेन्नई सुपर किंग्जनं आजच्या विजयासह २०२३ च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुजरातचा संघ पराभूत झाला असला तरी आयपीएल बाहेर गेलेला नाही. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे अजून एक संधी आहे. मुंबई आणि लखनऊ यांच्यातील विजेत्यासोबत गुजरातची लढत होईल, त्या लढतीत विजय मिळवल्यास गुजरातचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. गुजरातनं आजचा सामना जिंकून विजेतेपदाकडे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र, महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीपुढं गुजरातचे सर्व खेळाडू फेल ठरले आणि चेन्नईनं अंतिम फेरीत प्रवेश केला.
शुभमन गिलची एकाकी झुंज
आरसीबी विरुद्ध शतक झळकावत संघाला विजय मिळवून देणाऱ्या शुभमन गिलकडून गुजरातच्या संघाला मोठ्या आशा होत्या. मात्र, त्याला इतर खेळाडूंचं सहकार्य मिळालं नाही. शुभमन गिलनं १ षटकार आणि ४ चौकारासह ४२ धावा केल्या. शुभमन गिलच्या साथीला गुजरातचा इतर खेळाडू मैदानात पाय रोवून उभा राहू शकला नाही. राशिद खाननं अखेर फटकेबाजी केली, त्यानं ३० धावा केल्या. शुभमन गिल आणि राशिद खान वगळता इतर खेळाडू मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले.
चेन्नई अंतिम फेरीत, गुजरातला आणखी एक संधी
पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला पराभूत केल्यानं चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर, दुसरीकडे गुजरातकडे विजयाची अजून एक संधी आहे. एलिमिनेटर मधील विजेत्या सोबत गुजरातची लढत होणार आहे.