म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्राच्या पर्जन्यछायेमध्ये येणाऱ्या प्रदेशांमध्ये भूजलाची पातळी दरवर्षी सात सेंटीमीटरने कमी होत आहे. येत्या ३० वर्षांमध्ये हा साठा सहा मीटरपर्यंत खाली जाऊ शकतो. ही स्थिती केवळ पर्जन्यछायेच्या प्रदेशातच नाही तर उर्वरीत महाराष्ट्रातदेखील राहील.‘जर्मनीतील रिजनल एन्व्हायर्न्मेंटल चेंज’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध हवामान अभ्यासक आणि भूगोल अभ्यासक राहुल तोडमल यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. राज्यातील ५५ टक्के जिल्ह्यांमध्ये भूजल साठ्यात तूट आहे. यावर मानवनिर्मित दुष्काळही परिणाम करत असल्याचे या शोधनिबंधाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या काळात मानवनिर्मित दुष्काळाची भीतीही या शोधनिबंधात व्यक्त करण्यात आली आहे.

पूर्वी ७०० मिलीमीटर पाऊस पुरेसा होता, मात्र आता तसे वाटत नाही याचे कारण पीक रचनेतील बदलत्या पद्धतीशी निगडित असल्याचे त्यांनी या संशोधनात नमूद केले आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशात ऊस, मका, कांदा अशा अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची वाढती मागणी, त्यासाठी १२ महिने पाणी उपलब्ध होण्यासाठी शेततळ्यांची निर्मिती, त्या शेततळ्याला पाणी मिळावे यासाठी विंधन विहिरींचा वापर, विंधन विहिरींच्या माध्यमातून जमिनीतील पाणी खेचून घेणे हे दुष्टचक्र निर्माण होत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये सरासरी पर्जन्यमानात बदल झालेले नाहीत. पुढील ३० वर्षांमध्येही यात बदल होण्याची शक्यता नाही. मात्र आज पाण्यासाठी पावसाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसताना पारंपरिक पिकांपेक्षा नगदी पिके घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने पाण्याच्या प्रश्नासोबतच अन्नसुरक्षेचे आव्हानही निर्माण झाले आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली असून येत्या काळात ज्वारी, गहू यांसारखे धान्य आयात करायला लागू शकते, अशी भीती या शोधनिबंधात व्यक्त केली आहे.

उष्माघात, डिहायड्रेशनमुळे त्रासले नागरिक; मेंदूतील रक्त गोठून तीव्र झटका येण्याचीही भीती, अशी घ्या काळजी…
वाढत्या पाणीमागणीचे आव्हान

दुष्काळ म्हणजे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत हा मुद्दा लक्षात घेतल्यास भविष्यातील पाण्याची उपलब्धता स्थिर असली तरी मागणी वाढलेली असल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी नदी खोऱ्यांमधून वाहून जाणारे पाणी साठवणे ही शेतीच्या पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्याचा उपाय ठरू शकतो. मात्र यामुळे जलस्रोतांच्या वाटपात विषमता निर्माण होऊ नये याची काळजी घ्यायला हवी, असेही आवाहनही या शोधनिबंधात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here