जळगाव : मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटत असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. महेंद्र रामा मोरे (वय ५७ वर्ष, रा. जीवन नगर, जळगाव) असे मयत पित्याचे नाव आहे. ते ग. स. सोसायटीत प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. महेंद्र मोरे यांच्या मुलाचे लग्न अवघ्या दहा दिवसांवर आले होते, परंतु मुलावर अक्षता पडण्यापूर्वीच महेंद्र मोरे यांच्यावर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.जळगाव शहरातील जीवन नगरात महेंद्र रामा मोरे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. आशिया खंडातील शासकीय कर्मचाऱ्यांची सरकारी पतपेढी म्हणून समजल्या जाणाऱ्या ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. महेंद्र मोरे यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे १ जून रोजी लग्न होते. लग्नाची जोरदार तयारी मोरे कुटुंबात सुरु होती, लग्नाच्या पत्रिका सुद्धा वाटण्यात आल्या आहेत.

अवघ्या दहा दिवसांवर लग्न सोहळा असल्याने महेंद्र मोरे हे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पत्रिका वाटण्यासाठी मंगळवारी सकाळी घराबाहेर पडले. ग. स. सोसायटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पत्रिका वाटण्यासाठी महेंद्र मोरे हे चोपडा, अमळनेर, धरणगावमार्गे दुपारी तीन वाजता एरंडोल येथील ग. स. सोसायटीच्या कार्यालयात गेले. याठिकाणी ते खुर्चीवर बसले असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

पतीनिधनानंतर दुसरा आधारही हरपला, १८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खंबीर मातेचा आदर्श निर्णय
या प्रकाराने कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. तातडीने कर्मचाऱ्यांनी महेंद्र मोरे यांना एरंडोल शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणच्या डॉक्टरांनी त्यांना जळगाव येथे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र जळगावला पोहचण्याअधीच महेंद्र मोरे यांनी जगाचा निरोप घेतला होता. जळगाव शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे महेंद्र मोरे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

Heart Attack In Younger Age : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

डोळ्यादेखत आपला सहकारी महेंद्र मोरे यांच्या मृत्यूने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर महेंद्र मोरे यांच्या नातेवाईकांसह ग. स. सोसायटीच्या विविध ठिकाणच्या शाखांमधील कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. याठिकाणी महेंद्र मोरे यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. यावेळी ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी महेंद्रे मोरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

Pune Crime : पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, आजारपणातून टोकाचं पाऊल
महेंद्र मोरे यांच्या पश्चात पत्नी शारदा, मोठा मुलगा विक्रांत, लहान मुलगा कुणाल असा परिवार आहे. विक्रांत पुण्यात कंपनीत तर लहान मुलगा एमबीएचे शिक्षण घेत आहे. ज्या घरात दहा दिवसानंतर लग्नाची वाद्य वाजणार होती, त्याच घरात वर तरुणाच्या पित्याची अंत्ययात्रा निघणार आहे. यावेळी कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. या प्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here