खताच्या गोणीत मानवी सांगाडा आढळल्यानंतर वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहराच्या उत्तरेस जुन्या इरळा रस्त्यालगत असलेल्या एका शेताच्या धुऱ्याजवळ खताच्या गोणीत मानवी सांगाड्याचे तुकडे सापडले होते. हा सांगाडा कुणाचा हे तपासण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मालेगाव परिसरात मिसिंग असलेल्या महिलांची माहिती घेतली त्यात वेगवेगळ्या भागातून तीन महिला मिसिंग असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यातील एकीच्या बाबतीत पोलिसात कोणतीही तक्रार नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी जिल्हा परिषद शाळा मालेगावच्या जवळ राहणाऱ्या मुख्तार खान मोहम्मद खान (वय वर्ष 60) या मुलीच्या बापाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
त्याने पोलिसांना दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. बापाने सांगितलेल्या माहितीनुसार त्याची २५ वर्षीय मुलगी ही मतिमंद होती व तिच्या वागण्यामुळे कुटुंबियांना मोठा त्रास होत होता. एक दिवस रागाच्या भरात त्याने तिला मारहाण केली आणि गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरातच पुरून ठेवला. मात्र काही दिवस झाल्यानंतर घरात त्याचा वास येत होता. त्यामुळे पुरलेला मृतदेह उकरून सडलेल्या अवस्थेतील सांगाडा खताच्या गोणीत भरून त्याने बाहेर नेऊन टाकला होता. आता पोलिसांनी त्या निर्दयी बापाला अटक केली असून पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्यातआली आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे, सारिका नारखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवी सैबेवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास कोकाटे, प्रशांत वाढनकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, जितू पाटील, पोलीस हवालदार आशिष बिडवे आदींनी मोलाची भूमिका बजावली.