भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. ही माहिती धोनीने इंस्टाग्रामवरून दिली. धोनीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर पहिल्यांगा संभ्रम निर्माण झाला होता. धोनीने खरंच निवृत्ती घेतली की नाही, याबाबत उलगडा होत नव्हता. पण काही वेळाने अखेर धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबतचा उलगडा झाला. धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. आज धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटलाही रामराम ठोकला. त्यामुळे धोनी आता भारताच्या जर्सीमध्ये चाहत्यांना दिसणार नाही.

धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. कारण धोनी कर्णधार असताना भारताने सर्वात जास्त सामने जिंकले होते. धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाची चांगली बांधणी केली होती. त्याचबरोबर काही खेळाडूंना घडवण्यामध्ये धोनीचा सिंहाचा वाटा होता. धोनी सध्या आयपीएलचा विचार करत असेेल, असेच चाहत्यांना वाटत होते. पण आज अखेर निवृत्तीचा निर्णय घेत धोनीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

धोनी आयपीएल खेळण्यासाठी काल चेन्नईला रवाना झाला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर चेन्नईच्या संघातील खेळाडू होते. त्यावेळी धोनी हा फक्त आयपीएलचा विचार करत असेल, असे वाटले होते. कारण आयपीएलच्या कामगिरीवर धोनीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्द अवलंबून होती. त्यामुळे धोनी आधी आयपीएल खेळेल आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय करीअरचा काही दिवसांनी निर्णय घेईल, असे वाटत होते. पण तसे घडलेले पाहायला मिळाले नाही. आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे या स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर सर्वांचीच नजर असेल. त्याचबरोबर धोनी आता यापुढे किती वर्षे आयपीएल खेळणार, याचीही उत्सुकता चाहत्यांना आहे.

धोनीने आतापर्यंत सर्वांनाच धक्के दिले आहेत आज निवृत्तीचा निर्णय घेतानाही धोनीने सर्वांना धक्का दिला आहे. धोनी आज आपली निवृत्ती जाहीर करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. कारण धोनी आयपीेलच्या सरावासाठी चेन्नईमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे तो फक्त आयपीएलचा विचार करेल, असे सर्वांना वाटत होते. पण धोनीने यावेळीही सर्वांना धक्का देत इंस्टाग्रामवर आपली निवृत्ती जाहीर केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here