वैभवीच्या भावाचे रडने थांबेना
वैभवी उपाध्यायचा भाऊ अंकित उपाध्याय याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो बहिणीच्या आकस्मित निधनाने पूर्णपणे तुटून गेला आहे. एका व्हिडिओमध्ये जमनादास मजीठिया अंकितला मिठी मारून त्याला धीर देताना दिसत आहेत. वैभवी अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर भाऊ आणि पालकांसोबतचे फोटो शेअर करत असते. तिच्या जाण्याने त्यांचे कुटुंब हादरून गेले आहे. अभिनेत्रीच्या जाण्यावर कमेंट करून चाहतेही भावूक होताना दिसले.
अनेक टीव्ही कलाकारांनी घेतलं अंत्यदर्शन
वैभवी उपाध्यायच्या अंत्यदर्शनासाठी गौतम रोडेही पोहोचला. त्याचवेळी, साराभाई व्हर्सेस साराभाईमध्ये वैभवीसोबत काम करणारे सुमित राघवन ते देवेन भोजानी यांसारखे सर्व स्टार्सही अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. व्हिडिओमध्ये सर्व स्टार्स वैभवीच्या कुटुंबाची काळजी घेताना दिसत आहेत.
वैभवीच्या आई- वडिलांची अवस्था पाहवेना
वैभवीच्या आई-वडिलांसाठी हे दिवस अत्यंत कठीण आहेत. तिच्या आई-वडिलांचे अश्रू थांबायचे नाव घेत नसून मुलीच्या विरहाने त्यांना पुरते तोडले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या आईला स्वतःला सांभाळता येत नसल्याचे दिसते, तर वैभवीच्या वडिलांची अवस्थाही काहीशी तशीच आहे.
वैभवी उपाध्यायचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला
वैभवी उपाध्यायचा अपघात २२ मे २०२३ रोजी झाला होता. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हिमाचल प्रदेश येथे फिरायला गेली होती. तेव्हाच एका वळणावर त्यांच्या गाडीचा तोल बिघडला आणि त्यांची गाडी खोल खाईत पडली. यात अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला.