हा अपघात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या कार्यक्रम स्थळापासून पाच किलोमीटर अंतरावर झाला. झालेला अपघात इतका भयंकर होता की, यात तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य २० जण जखमी झाली आहेत. जखमींना उमरिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील अर्ध्या जखमींची परिस्थिती चिंताजनक आहे.
उमरिया जिल्ह्यातील धानोरा येथे ‘लाडली बहना’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहणार होते. त्यामुळे गर्दी जमविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत परिसरातून महिलांना गोळा करून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले जात होते. याचदरम्यान एका गावातून महिलांना घेऊन येणाऱ्या बसचा दुचाकी वाचविण्याच्या नादात टायर फुटून अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. जखमींची विचारपूस केल्यानंतर त्यांनी उमरियाच्या घाघरी नाक्याजवळ झालेल्या बस अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, या संकटाच्या काळात आपण पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. या कुटुंबांच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासोबतच कुटुंबातील एका सदस्याला पात्रतेनुसार सरकारी नोकरीत घेतले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जखमींवर संपूर्ण उपचाराचा खर्च मोफत करण्यात येणार असून गंभीर जखमींना ५० हजार रुपये आणि मध्यम जखमींना १० हजार रुपये दिले जाणार आहेत. दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षाचे नेते असलेल्या कमलनाथ यांनी या अपघात प्रकरणावर दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.
उमरिया जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या बसला झालेल्या अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. मला मुख्यमंत्र्यांकडून जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये वारंवार बसचे अपघात का होत आहेत? आणि मध्य प्रदेशातील नागरिकांचे बळी का जात आहेत? हे अपघात रोखण्यासाठी काहीच का केले जात नाही? असा सवाल करत सरकारी खर्चाने तुमच्या तमाशासाठी जनतेचा वापर करणे आणि त्यांचा जीव धोक्यात घालणे हा केवळ गंभीर गुन्हाच नाही तर पापही आहे, अशी टीकाशिवराजसिंह यांच्यावर केलीये.