मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत शनिवारी एक बैठक घेतली. ज्या ठिकाणी लॉकडाऊन उठवण्याची घाई झाली आहे, तिथे पुन्हा लॉकडाऊन केला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. करोनाची लागण फक्त ज्येष्ठ नागरिकांना होतो आणि लहान मुलांना होत नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर ९७ हजार मुलांना करोनाची लागण झाली, याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, करोना हा कुणालाही होऊ शकतो. सहा महिन्याच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तिला करोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही.
सध्या महाराष्ट्रात करोनाची पहिलीच लाट आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येऊ द्यायची नाही. दुसरी लाट ही कंबरडे मोडणारी असून त्यामुळे ही लाट कशी थोपवायची याची आपली तयारीही सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. करोनाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसल्याचं मी जाणून आहे. जर शाळा सुरू झाल्यावर शाळेत करोनाचा संसर्ग फैलावला किंवा कार्यालये उघडल्यानंतर त्यात करोनाचा संसर्ग वाढला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी आपण मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज्यात काल ३२२ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून आज दिवसभरात १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी काल ६ हजार ८४४ रुग्ण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या सहा लाखांच्या जवळ पोहचली आहे. राज्यात सध्या १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर (अॅक्टिव्ह रुग्ण) प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. राज्यातील कालचा करोना साथीचा तपशील हाती आला असून करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाल्याने चिंता वाढली आहे. काल दिवसभरात ६ हजार ८४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत ४ लाख ८ हजार २८६ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यात करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ६९.८२ टक्के इतके आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times