Bhiwandi Crime News:  यंत्रमाग उद्योग आणि कामगार नगरी असलेल्या भिवंडी शहरात (Bhiwandi News) झोपडपट्टी परिसर ते उच्चभ्रू परिसरात जुगार, मटक्याचे अड्डे ठिकठिकाणी सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अनेकदा छापे मारले आहेत. असे असतानाही आजही शहरातील कामगार वस्त्यात  जुगार मटका सुरु असल्याचे  आमदारांनी एका अड्ड्यावर अचानक  मारलेल्या  छापेमारीतून उघड झाले. यामुळे जे काम पोलिसांना जमले नाही, पण आमदारांनी रंगेहाथ जुगार माफियांना पकडल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याची चर्चा भिवंडी शहरात रंगली आहे. 

भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वस्त्या आहेत. या वस्त्यात  लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहत असून या कामगार वर्गात  दारूचे व्यसन आणि मटका, जुगाराचा  नाद आहे.  यामुळे वस्त्या वस्त्यात ठिकठिकाणी जुगार मटक्याचे अड्ड्यासह विविध प्रकारचे गोरखधंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी नेहमीच विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पोलीस प्रशासनाने करीत असतात, अशीच एक तक्रार भिवंडीतील समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्याकडे करण्यात आली होती. त्यातच आमदार शेख यांचा महापालिका अधिकाऱ्यासह नालेसफाईचा पाहणी दौरा 23 मे रोजी होता.

याच दौऱ्या दरम्यान दुपारी चार वाजल्याच्या सुमारास भिवंडीतील  भरत कंपाऊंड भागातील नालेसफाई पाहणीसाठी गेले असता, आमदार शेख यांना  मटका जुगार अड्डा सुरू असल्याचे दिसताच, त्यांनी एका जुगार माफियाला पकडले. त्यानंतर बंद शटर आड मोठ्या प्रमाणात विविध जुगाराचे साधने आणि आणखी काही जुगार माफिया आढळून येताच , आमदार शेख यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात या छापेमारीची माहिती दिली. काही वेळातच पोलीस जुगार अड्ड्यावर दाखल होऊन जुगार माफिया अहमदअली उस्मान कारभारी (वय 52, रा. तोफानाका, भिवंडी) निहाल अहमद अब्दुल मजीद मोमीन ( वय 59, रा. शांतीनगर, भिवंडी ) अबु सत्तार फतेअहमद शेख (वय 60, रा. नविवस्ती, भिवंडी ) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जुगार मटक्याच्या अड्ड्यातुन  दाणा घोडी, अंदर बहार , काला पिलासह कल्याण मेन मटका जुगाराचे साहित्य आणि 3 हजार 550 रुपये रोख जप्त केले. 

दरम्यान, या जुगार अड्ड्यावर आमदारांनी धाड टाकल्याने मग शहरातील पोलीस करतात काय ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. याप्रकरणी पोलीस शिफाई रवींद्र बारकु पाटील यांच्या तक्ररीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात जुगार माफिया त्रिकुटावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार अनिल शिरसाठ करीत आहेत.

news reels reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here