छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील पैठण एमआयडीसी येथे कंपनी चालवायची असेल तर चार कोटी रुपयांची खंडणी आणि पाच लाख रुपये रोख द्या. तसेच मला वीस हजार रुपये महिना सुरू करा, असं म्हणत एका उद्योजकाला कंपनीत घुसून मारहाण करण्याच्या धमक्या देणाऱ्या खंडणीखोराच्या जिल्हा ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णु आसाराम बोडखे (वय ५७ रा.सेंट पॉल, मुधलवाडी ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.फिर्यादी यांची पैठण एमआयडीसी येथे नामांकित कंपनी आहे. सदर आरोपी हा एक डिसेंबर २०२२ पासून कंपनी मालक व व्यवस्थापक यांना धमक्या देत होता. तुम्ही कशी कंपनी चालवता? कंपनीत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करेन. कोणाला कसे फसवायचे आहे हे मला माहित आहे, अशा धमक्या संबंधित आरोपी देत होता. तसेच कंपनी विरोधात विविध शासकीय कार्यालयामध्ये अर्ज दाखल करून अर्ज मागे घेण्यासाठी वारंवार आरोपी वारंवार पैशाची मागणी करत होता.कंपनीची बदनामी होऊ नये यासाठी कंपनी व्यवस्थापकाकडून तक्रार मागे घेण्यासाठी दीड लाख रुपये आरोपी विष्णू बोडके याला खंडणी म्हणून दिले होते. दीड लाख घेऊनही आरोपी बोडके याचं समाधान झालं नाही. तो पुन्हा कंपनी व्यवस्थापकांना धमक्या देऊ लागला. यावेळी कंपनी व्यवस्थापकाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, त्याने कंपनी कायमची बंद करतो. कंपनीची बदनामी थांबवायची असेल तर चार कोटी रुपये द्यावे लागतील तसेच सध्या पाच लाख रुपये रोख लागतील आणि यापुढे वीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला द्यावे लागतील अशी धमकी देत जबरी खंडणीची मागणी केली.खंडणीखोराच्या त्रासाला कंटाळलेल्या कंपनी मालक व व्यवस्थापकांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची भेट घेऊन खंडणी मागणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, राहुल मोहतमल, कृष्णा उगले, मिलींद घाटेश्वर, यांच्या पथकाने केली.एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीला किंवा उद्योजकांना अशा प्रकारे विनाकारण त्रास देऊन त्यांच्याकडून बळजबरीने पैशांची मागणी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. खंडणीची मागणी करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल. जर कोणी अशा प्रकारे खंडणीची मागणी करत असेल तर तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी. जिल्ह्यातील कंपनी मालक व व्यवस्थापक यांना अशा व्यक्तींपासून सुरक्षिततेची हमी देऊन त्यांना तात्काळ पोलीसांची मदत उपलब्ध करून देण्याबाबत पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी आश्वस्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here