म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी अधिकची पदरमोड करत प्रवासी वातानुकूलित लोकलचे तिकीट व पास खरेदी करतात. मात्र या लोकलमधील वातानुकूलित यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. अशातच पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलमधील दोन डब्यांतील यंत्रणा बुधवारी बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी वांद्रे स्थानकात ही लोकल अडवून ठेवली.विरार स्थानकाहून एसी लोकल सकाळी ७.५६ मिनिटांनी चर्चगेटसाठी रवाना झाली. गाडी सुरू होताच दोन डब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रवासी लोकलचा दरवाजा बंद होऊ देत नसल्याने भाईंदर, मीरा रोड, दहिसर, बोरिवली या स्थानकांवर लोकल नियमित वेळेपेक्षा अधिक मिनिटे थांबली. प्रवासी वाढत गेले तसे त्रासही वाढला. एसी बंद असल्याने प्रवाशांना प्रचंड उकडत होते. अखेर वांद्रे स्थानकात प्रवाशांनी एकच हल्लोबाल करत लोकलचे दरवाजे अडवून ठेवले. १० मिनिटांनंतरही लोकल सुरू होत नसल्याने रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी लोकलजवळ पोहोचले. प्रवाशांनी हकीकत सांगितल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त केला. दोन्ही डब्यांतील वातानुकूलित यंत्रणा सुरू झाल्यानंतर लोकल चर्चगेटसाठी रवाना झाली.
याआधीही तक्रारी
यापूर्वी पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलमध्ये वातानुकूलित यंत्रणा चालत नसल्याच्या प्रवाशांच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे कारशेडमध्ये लोकलची देखभाल-दुरुस्ती होते का, लोकलच्या वातानुकूलित यंत्रणेसाठी वार्षिक तपासणी होते का, असे प्रश्न बुधवारच्या गोंधळानंतर पुन्हा उपस्थित करण्यात आले.
लोकलच्या तुफान गर्दीत लेकराला एकदम स्पेशल सीट; आईची अनोखी शक्कल